शेवगाव- घोटण विज वितरण उपकेंद्रातील पॉवर रोहित्रास लागली आग
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील घोटन येथील विज वितरण उपकेंद्रातील पॉवर रोहित्रास बुधवारी सकाळी आग लागली. अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
शेवगाव – पैठण राज्य मार्गालगत घोटन येथे विज वितरण कंपनी उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या आवारात असणाऱ्या पॉवर रोहित्राला बुधवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान अचानक लाग लागल्याने सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. त्यांनी तातडीने उप अभियंता यांना घटनेची माहिती देऊन अग्निशामक दलाला पाचारण केले. गंगामाई कारखाना व पाथर्डी नगरपरिषद अग्निशामक बंबाच्या साहाय्याने एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत जवळपास ५० ते ६० हजाराचे नुकसान झाले आहे. या कार्यालयाच्या आवारात इतरही साहित्य होते. तसेच कार्यालयाची इमारत जवळच होती. मात्र, आग आटोक्यात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
विजेच्या बिघाडाने ५ एमव्हिए अश्वशक्तीच्या रोहित्रातुन ऑईल गळती झाल्याने उपकेंद्राच्या आवारातील या रोहित्राणे पेट घेतला. वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, उप अभियंता एस.एम. लोहारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सदर उप केंद्रातुन सहा गावच्या गावठाणास व दोन गावांना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा होतो. हे पॉवर रोहित्र जळाल्याने इतर रोहित्रावरूण गावठाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दोन दिवसात शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचे उप अभियंता लोहारे यांनी सांगितले