महाराष्ट्र
1428
10
शेवगाव तालुक्यात आंदोलकांकडून ऊसतोड बंद
By Admin
शेवगाव तालुक्यात आंदोलकांकडून ऊसतोड बंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव - ऊस स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल दत्तात्रय फुंदे व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी येथील ऊसतोड सुरू असलेल्या थळावर जावून दुर्गेचा अवतार धारण करत ऊस तोड थांबविली.
यावेळी संघटनेच्या महिला सदस्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला.
राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती मागे घेऊन येत्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा नव्याने दुरुस्ती करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उताऱ्याच्या आधारावर यंदाच्या 2022-23 च्या हंगामामध्ये एक रकमी एफआरपी द्यावी. मागील 21-22 च्या हंगामात गाळप केलेल्या उसासाठी एफआरपी अधिक 200 रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल व आज शुक्रवारी ऊस तोड व वाहतूक बंद आंदोलनाची हाक दिली होती.
तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसरातील साखर कारखाना प्रशासनास त्यांनी दोन दिवस ऊस तोड व वाहतूक बंद करून स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठबळ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार परिसरातील काही कारखान्यांनी काल एकेक शिफ्ट बंद ठेवली. कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली होती. मात्र, आज महिला आंदोलकांनी रणरागिणी बनून प्रत्यक्ष ऊसतोडीच्या स्थळी जाऊन ऊसतोड बंद करुन सर्वांवर कडी केली. यावेळी ऊस तोड मजुरांनी देखील कोयता बंद करुन महिला आंदोलकांना प्रतिसाद दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल फुंदे, तालुकाध्यक्षा बायजाबाई बटुळे, शहराध्यक्षा हिराबाई घोडके, बालिका फुंदे, जयश्री काथवटे यांनी ऊसतोड सुरू असलेल्या थेट थळावर जावून संबधित शेतकऱ्यांचे प्रबोधन करून ऊसतोड थांबविली. यावेळी काही काळ महिला आंदोलकांनी केलेल्याघोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. स्वाभिमानी संघटनेचे दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने ऊसतोडीचा साखर कारखान्याला फटका बसला आहे.
Tags :

