महाराष्ट्र
वाहनचालकांना अडवून लूटमार करणारे दोन दरोडेखोर जेरबंद
By Admin
वाहनचालकांना अडवून लूटमार करणारे दोन दरोडेखोर जेरबंद
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 'या' गावातील दरोडेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोरांना पैठण पोलीस पथकाने पाठलाग करून जेरबंद केले.
हा थरारक प्रसंग दरोडेखोर आणि पैठण पोलिसांमध्ये आज (दि.१५) पहाटे घडला. यावेळी दरोडेखोरांकडून प्राणघातक शस्त्र, तलवार, रामपुरी चाकूसह ६ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास इतर राज्यातून कोपरगाव, नाशिक येथे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला बोलेरो गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी रहाटगाव फाट्याजवळ अडवले. आणि ट्रक चालकाला तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत १ हजार ४०० रुपये जबरीने काढून घेतले. याची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तत्काळ आपले पथकसोबत घेऊन बोलेरो गाडीचा शोध सुरू केला.
अखेर पाचोड पैठण रोडवर संशयास्पद एक बोलेरो निदर्शनास आली. ही गाडी पोलीस पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलीस पथकाला हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि दरोडेखोरांचा पाठलागाचा थरार सुरू होता. अखेर बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच. १६ सी.वाय ५१७७) पकडण्यास यश आले. दोन जिल्ह्यात लुटमार करून धुमाकूळ घालणाऱ्या सोमनाथ दादासाहेब नरोडे (रा. घोटण ता. शेवगाव जि. अहमदनगर), स्वप्निल मारुती दराडे (रा. पांगरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांच्याकडून तलवार, रामपुरी चाकू, महागडे तीन मोबाईल, रोख १८०० रुपये असा एकूण ६ लाख ४६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण येथील पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, सहायक फौजदार संजय मदने, पोलीस नाईक नरेंद्र अंधारे, कल्याण ढाकणे, दिनेश दांडगे, कृष्णा दुबाले, अंकुश शिंदे, होमगार्ड नरोडे, यांच्या पथकाने केली.
या दरोडेखोरांनी यापूर्वी शेवगाव परिसरात जबरी चोऱ्या करण्यात आल्याचे गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी दोघांवर गुन्हा दाखल करून रविवारी त्यांना पैठण येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. या दोघांकडून दोन जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केली आहे.
Tags :
238049
10