महाराष्ट्र
नेवासा- बंड नाही त्यांनी गद्दारीच केली, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
By Admin
नेवासा- बंड नाही त्यांनी गद्दारीच केली, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी भर पावसात साधला संवाद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आदित्य ठाकरे यांनी भर पावसात साधला संवाद
गेल्या तासाभरापासून तुम्ही पावसामध्ये उभे आहात, तुम्ही पावसात असताना मी तरी का छत्री घ्यायची, मी सुद्धा पावसातच उभा राहणार व बोलणार, असे ते म्हणताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आदित्य ठाकरे यांनी भर पावसामध्ये सुमारे 25 मिनिटे जनतेशी संवाद साधून मने जिंकली.
नेवासा फाटा परिसरामध्ये आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक चौका चौकामध्ये लागलेले होते. आदित्य साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.
सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जमलेला होता. आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी सर्वजण तयारीत असताना पाऊस आला. पावसामध्ये सर्व शिवसैनिक, जनता हे पावसात चिंब भिजली होती पण कोणी भाषण होईपर्यंत हलले नाही वेळप्रसंगी छत्री घेऊन हे सभेच्या ठिकाणी आले होते.
शिवसेनेत असताना या चाळीस गद्दारांना आपण वेळोवेळी आपण पदे दिली, त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ,नाव दिलं ,वेळप्रसंगी आमदार, खासदार केलं, मंत्रीपद दिलं एवढं सगळं दिलं असताना त्यांनी गद्दारी केली ही गद्दारी कोणालाच आवडलेली नाही.
त्यांनी बंड नाही तर गद्दारीच केली आहे , गद्दार आहेत ते राज्य करू शकत नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी नेवासा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये दिला. विशेष म्हणजे भर पावसामध्ये ही अर्धा तास ही सभा झाली. आदित्य ठाकरे यांनी कोणतेही कवच न घेता पावसात भाषण करून जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम मिळवले. पाऊस कोसळत असतानाही या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
संभाजीनगरचा दौरा झाल्यानंतर संवाद यात्रा ही शिर्डीकडे जात असताना नेवासा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार उदय रजपूत, माजी मंत्री बबनराव घोलप, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे ,जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी ,युवा सेनेचे उदयनराजे गडाख आदी यावेळी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मराठवाडा संभाजीनगर या ठिकाणी गेलो होतो प्रचंड असा प्रतिसाद शिवसेनेला मिळत आहे. सध्या आपले सरकार नसले तरी जनतेची साथ आपल्याला आहे. शिवसेनेची सत्ता असताना आपल्या चाळीस गद्दारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, वास्तविक पाहता यांना पक्षांमध्ये असताना आपण पदे दिली, त्यांना मानसन्मान दिला, वेळप्रसंगी आमदार ,खासदार केले ,मंत्री केले, पण हे सर्व ते विसरले व त्यांनी गद्दारी करून सत्ता स्थापन केली. वास्तविक पाहता हे आता आम्ही बंड वगैरे केले असे सांगता देत पण हे बंड नाही तर ही गद्दारीच आहे, जे गद्दार आहे ते राज्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. ते गेल्याचं आम्हाला दुःख नाही पण या दु: खातून बाहेर पडण्यासाठी आता मी तुमच्याकडे आलो आहे असे ते म्हणाले.
गद्दारांचे सरकार टिकणार नाही, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सभागृहामध्ये आम्ही असताना हे गद्दार आमच्या समोर होते. मात्र ते आमच्याशी नजरेला नजर देऊ शकत नव्हते, असे ते म्हणाले. आज शिवसेनेबरोबर जे आमदार आहेत ते शूरवीर आहेत, असे ते म्हणाले. ज्यांना आपण वर्षानुवर्ष सांभाळलं त्यांनी गद्दारी केली, हे आपल्याला समजू शकले नाही. शेवटी गद्दार तो गद्दारच असतो हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवावे असे ते म्हणाले. हे गद्दार तिकडे गेले आता त्यांना त्या ठिकाणी काय मिळणार आणि यांचे कशा पद्धतीने जग बदलणार असा टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यांना शिवसेनेमध्ये असताना जी किंमत होती ती आता त्यांना मिळेल का, असा सवाल त्यांनी केला.
राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारभार सुरू केला. सुरुवातीला कोविडचे वातावरण होते ते दोन वर्षे सलग राहिले, त्या दरम्यान उद्धव साहेबांना मणक्याचा त्रास झाला त्यांचे एक नाही तर दोन ऑपरेशन त्या कालावधीमध्ये झाले. एवढे असताना त्यांनी घरातूनच थांबून जनतेची कामे सुरू ठेवली ,कधी राज्याचा गाडा थांबू दिला नाही. त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांचा मोठा गौरव देशभरामध्ये झाला. बहुदा याचे शल्य या गद्दारांना सहन झाले नाही. सर्वत्र राज्यात सुख, शांती ,नांदत होती. कुठे दंगे झाले नाही हेच बहुदा यांच्या पोटात दुखत असावे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेमध्ये आलेले शंकरराव गडाख यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, त्यावेळी त्यांनी सत्ता असो अथवा नसो मी तुमच्यासोबत राहील, असा शब्द दिला व तो शब्द आज त्यांनी खरा करून दाखवला याला म्हणतात निष्ठा, असे ते म्हणाले. ज्या वेळेला या गद्दारांनी शिवसेनेला सोडून गेले त्यावेळेला माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. हेच खरं प्रेम, हाच खरा जिव्हाळा आणि हेच खरं हिंदुत्व असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यामध्ये गद्दारांचे सरकार हे कोसळणार असून लवकरच मध्यावती निवडणुका लागतील, असे सांगून ते म्हणाले की हीच गर्दी शिवसेनेवरील निष्ठा पक्षाबरोबर कायम ठेवा, गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या असे ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलाच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये रायगडसाठी 600 कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं व तो तात्काळ उपलब्ध करून दिला तर शेवटच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगरचे नामकरण केलं असे ऐतिहासिक निर्णयसुद्धा सरकारने त्यावेळी घेतले, असे ते म्हणाले.
जे गद्दार आमदार व खासदार गेले आहेत, त्याचे दुःख नाही पण त्यांनी जिथे गेले आहे तिथेच राहावं आनंदात राहा. मात्र हिम्मत असेल तर राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जा, जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, असे पुन्हा आवर्जून सांगितले.
यावेळी शिवसेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी संवाद यात्रा सुरू केली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी या यात्रेचे स्वागत होत आहे, आज या ठिकाणी भर पावसामध्ये मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे ,लोकांचे शिवसेनेवर प्रेम आहे, हे यातून पुन्हा दिसून आलेले आहे. ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईलच, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शंकरराव गडाख यांनी शिवसेनेमध्ये आल्यावर जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला, एक प्रकारे त्यांनी शिवसेनेवर जी निष्ठा ठेवली त्याची तोड कोणालाच नाही असे ते म्हणाले. आज शिवसेनेने अनेकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आज अनेकजण भाषणातून आपण काय करतोय सांगताहेत, पण दुसरीकडे ज्यांनी गद्दारी केली आहे ,त्यांचे पितळ उघड झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. आज शिवसेनेच्या मागे सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी राहिली आहे, असे ते म्हणाले.
युवा सेनेचे उदयन गडाख म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी संवाद यात्रा सुरू केली तिला चांगला प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळालेला आहे. आज युवा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झाला आहे. महाविकास आघाडी असताना अनेक धडाकेबाज कामे या सरकारच्या माध्यमातून झाले. मात्र, काही गद्दारांना ती पटली नाही म्हणून ते बाहेर पडले आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आगामी काळामध्ये शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार आपण सर्वांनी करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. कठीण काळामध्ये ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्या त्या वेळेला शिवसैनिक हे पाठीशी राहतातच पण नेवासा तालुकासुद्धा हा शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, असे ते म्हणाले.
यावेळी राजेश पठारे नंदकुमार गोसावी , नेवासा तालुका शिवसेनाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, पंकज लाभाते, उपप्रमुख सारंग फोपसे ,मकरंद राजहंस त्याप्रमाणे युवा सेना जिल्हाप्रमुख निरज नांगरे ,उपप्रमुख शुभम उगले, नेवासा तालुका युवा सेना प्रमुख कैलास लष्करे, शहर प्रमुख महेश गरुटे, शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, एकनाथ कुसळकर, पाथर्डी तालुकाप्रमुख भगवान दराडे, शेवगाव तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
7560
10