महाराष्ट्र
डॉ. निलेश म्हस्के मारहाण प्रकरणातील आरोपींना कडक शासन करा - डॉक्टर संघटनांचे पाथर्डी तिसगाव येथे आंदोलन
By Admin
तिसगाव-डॉ. निलेश म्हस्के मारहाण प्रकरणातील आरोपींना कडक शासन करा - डॉक्टर संघटनांचे पाथर्डी तिसगाव येथे आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील डॉ. निलेश म्हस्के यांना मारहाण करणार्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी डॉक्टर संघटनांनी, तिसगाव व पाथर्डी येथे आंदोलन केले.
पाथर्डी पोलिस स्टेशन वर धडक मोर्चा नेला तसेच तेथे उपस्थित पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर तिसगाव येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तेथे पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास चव्हाण यांनी आंदोलन करणार्या डॉक्टरांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या निदर्शनामधे, अहमदनगर आय एम ए, अहमदनगर स्त्रीरोग व प्रस्तुती शास्र संघटना, पाथर्डी, शेवगाव, तिसगाव तसेच तालुक्यातील डॉक्टर संघटना, राहुरी तालुका डॉक्टर संघटना, जामखेड तालुका डॉक्टर संघटना, श्रीगोंदा तालुका डॉक्टर तसेच जिल्ह्यातील सर्व संघटना यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या प्रसंगी अहमदनगर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बंशी शिंदे, यांनी डॉक्टर वरील हल्ले सहन केले जाणार नाहीत व अशा प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी डॉक्टर संघटना पाठपुरावा करतील असे सांगितले.
आय एम ए, अहमदनगर चे सचिव डॉ सचिन वहाडणे यांनी, डॉक्टरांवरील या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दांत निषेध केला. या आरोपींना शिक्षा ही अशा समाजकंटकांना चपराक ठरेल अशी आशा व्यक्त केली.
आय एम ए, अहमदनगर चे माजी अध्यक्ष डॉ रवींद्र सोमाणी यांनी डॉक्टर हे नेहमीच आपल्या रुग्णांचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्नशील असतात. रुग्ण दगावल्यास, डॉक्टरांच्या चुकीनेच दगावला ही समाजाची मानसिकता चुकीची आहे. डॉक्टरांच्या उपचाराबाबत तक्रार असल्यास, त्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब रुग्ण व नातेवाईक करू शकतात. कायदा हातात घेऊन डॉक्टरांना मारहाण करणे ही तालिबानी मानसिकता बदलायला हवी.
यावेळी, डॉ सौ जोस्ना डौले यांनी रूग्णांनी केलेल्या कौतुकाने हुरळून जाऊ नये तर रुग्णानी केलेल्या टीका वा आरोपांनी निराश होऊ नये असा सल्ला डॉक्टरांना दिला.
डॉ संदीप सुराणा यांनी डॉ.निलेश म्हस्के यांना आरोपींना शासन होण्यासाठी दिर्घकालिन कायदेशीर लढाई साठी तयार राहण्यास सांगितले.
राहुरी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रसाद ढुस यांनी, संकटसमयी, रूग्णामधे गुंतागुंत उद्भवल्यास सर्व डॉक्टर्स नी मदतीसाठी त्या रूग्णालयात धाव घेतल्यास, अप्रिय घटना टाळता येऊ शकतील असे मत व्यक्त केले.
तिसगाव येथील जेष्ठ डॉ. भानुदास देशमुख यांनी लोप चालत चाललेली फॅमिली डॉक्टर संकल्पना व डॉक्टरांना ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत आणल्याने रुग्ण ग्राहक झाला आहे. व त्यामुळे डॉक्टर रुग्ण संबंध बिघडले आहेत. त्यामुळे डॉक्टर विषयी आदर व विश्वास कमी झाला आहे. यासाठी शासन, डॉक्टर संघटना, सामाजिक संस्था अशा पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे असे मत डाॕ.देशमुख यांनी व्यक्त केले.
विविध संघटनांचे मिळून 100 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या आंदोलनात उत्स्फूर्त भाग घेऊन आपले सहकार्य देऊ केल्या बद्दल डॉ. निलेश म्हस्के यांनी आभार व्यक्त केले.
Tags :
1361
10