संजय गांधी समिती स्थगिती उठविल्यामुळे विविध योजनांचा लाभ थेटपणे मिळेल- प्रतापराव ढाकणे
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुका संजय गांधी निराधार योजना व अन्य शासकीय समित्यांवरील स्थगिती उठविण्यात आली असून त्यासंबंधीचे अध्यादेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पारित केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी दिली.
याबाबत बोलतांना अॕड.ढाकणे म्हणाले, तालुक्यातील विविध शासकीय समित्यांवर मागील महिन्यात काही प्रशासकीय अडचणींमुळे स्थगिती आली होती.त्या त्रुटी मंगळवारी मुंबई येथे झालेल्या पालकमंत्र्याच्या बैठकीत सोडविण्यात आल्या. तालुकास्तरीय विविध शासकीय समित्यांना मिळालेल्या स्थगितीचे आदेश रद्द करण्यात आले असून, यासंदर्भात प्रशासकीय अध्यादेश स्थानिक पातळीपर्यंत काढण्यात येईल.यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील सहभागी होते.
स्थगिती उठविल्यामुळे तालुक्यातील उपेक्षित,वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेटपणे मिळण्यास मदत होऊन त्यांची यासंदर्भातील प्रकरणे मार्गी लागू शकतील.राज्यातील महाविकास आघाडी सरकार तळागळातील घटकांसाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबवीत असून, तालुकापातळीवरून त्याचा योग्य पाठपुरावा करत या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे प्रयत्न केला जाईल,असे अॕड. ढाकणे शेवटी म्हणाले.