महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागामार्फत मुलींच्या वसतिगृहास मान्यता
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींचे शासकीय वसतिगृहास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
उसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ( मुले व मुली ) शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतीगृह सुरु करण्यात येत आहे. येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालय परिसरात मुलींसाठी वसतीगृह सुरु करण्यास परवानगी मिळाली असून या वसतीगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपस्थितीनुसार प्रत्येक मुलीला ५०० रु. निर्वाह भत्ता प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे. तसेच गणवेश, शैक्षणिक सहल या साठीही आर्थिक मदत प्रत्येक मुलीला दिली जाणार आहे. विद्यार्थीनीसाठी मोफत शैक्षणिक सुविधेबरोबरच संगणक, इंटरनेट व वाचनालयाची सुविधा दिली जाणार आहे. १०० मुलींच्या क्षमतेचे हे वसतीगृह असून सदरच्या वसतीगृहात केवळ ऊसतोड कामगारांच्या मुलींनाच प्रवेश द्यावयाचा असल्याने ऊसतोड कामगार असल्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तरी गरजू ऊसतोड कामगारांच्या मुलीनी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपले उच्चशिक्षणाचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले आहे.