MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
प्रतिनिधी - नगर citizen
१४ मार्च रोजी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर आता भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय अस ट्विट करून सरकार वर निशाना साधला आहे.
महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी MPSC परीक्षेची वाट पहात होते परंतु कोरोनाचे गोजिरवाणे कारण देऊन परिक्षा अचानक पुढे ढकलली,कोरोना ची पुरेपूर काळजी घेऊनही परीक्षा घ्यायला हरकत नव्हती.पण सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय मग पर्याय कसा सुचेल?
अस ट्विट करून राम सातपुते यांनी सरकारवर टीका केली आहे.
१४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.