गारपीटग्रस्तांना प्रत्येकी कुंटुबास 4 हजारांची मदत; पहा कोणत्या साखर कारखान्याने केलीय अशी ठोस मदत..!
नगर सिटीझन live team-
अवकाळी पाउस आणि एकूणच अस्मानी संकटांची तमा न बाळगता शेती फुलवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खूप कमी संस्था आणि राजकीय नेते पुढे येतात. सरकार दरबारी पाठपुरावा करीत असल्याचे सांगत नेते मार्ग काढतात. मात्र, पाथर्डी येथील सहकारी साखर कारखान्याने याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे काम केले आहे.
शनिवारी सायंकाळी बोधेगाव परिसराला (ता. पाथर्डी) वादळी वारा आणि गारांच्या जोरदार पावसाने झोडपले. गहू, हरभरा, जनावरांच्या चाऱ्याची मका तसेच उन्हाळी पिके (कांदा, बाजरी) आदी पिकाचे प्रचंड नुकसान यामुळे झाले. त्यावर 'केदारेश्वर'चे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी पाहणी करत शासन दरबारी मदतीसाठी आग्रही मागणी केली.
तसेच 'केदारेश्वर'च्या सभासद शेतकरी कुटुंबास प्रत्येकी चार हजार रुपयांची थेट मदतही जाहीर केली.
दरम्यान, कार्यक्षेत्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना थेट रोख मदतीची घोषणा करणारा 'केदारेश्वर' हा राज्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना ठरला असल्याचा दावा केला जात आहे. शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, शेकटे बुद्रुक, सुकळी, बोधेगाव आणि परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन शेतकरी संकटात सापडले आहेत.
'केदारेश्वर'चे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहायक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण, कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे, लाडजळगावचे भाऊसाहेब क्षीरसागर, काकासाहेब तहकीक, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, शेकटेचे तात्यासाहेब मारकंडे, गोळेगावचे संजय आंधळे आदींसह शेतकऱ्यांनी या भागाच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल बनवण्यास सुरुवात केली आहे.