पाथर्डी- भाच्याच्या घरी डल्ला मारणारा मामा जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भाच्याच्या घरातून सोने व चांदीसह रोख रक्कम चोरणार्या मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
राजू कांतीलाल मोरे (वय 55, रा.सटवाई तांडा, जि. जालना) असे आरोपी मामाचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील विक्रम भाईलाल जाधव (वय 23, मूळ रा. चिचवीर, तांडा, जि.नाशिक) यांच्या राहत्या घरी 28 डिसेंबरला चोरीची घटना घडली होती. जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने व चांदीचे दागिने, तसेच रोख 85 हजार रुपये, असा एकूण एक लाख 45 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात राजू मोरे यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मोरे यास 31 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्याने सोने-चांदीचे साठ हजारांचे दागिने व दहा हजार रुपये रोख, असा एकूण सत्तर हजारांचा ऐवज पोलिसांना काढून दिला. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी ही कारवाई केली.