महाराष्ट्र
21876
10
कृतीतून साकारलेले व्यक्तिमत्व- कै. सौ. जनाबाई दौंड
By Admin
कृतीतून साकारलेले व्यक्तिमत्व- कै. सौ. जनाबाई दौंड
पाथर्डी प्रतिनिधी
आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई हे प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आई एक विश्वास आहे. आमची आई तिचे नाव जनाबाई होते. आम्ही बाई म्हणून तिला हाक मारत असत.
सन १९३८ मध्ये अशिक्षित कुटुंबामध्ये वडील सुक्ताजी आणि आई कोंडाबाई यांचे पोटी कै.जनाबाईचा जन्म झाला. दोन भाऊ आणि दोन बहिणी असे हे सात जणांचे कुटुंब मौजे कोनोशी गावी राहत होते. आई- वडील शेती तसेच मोल मजूरी करून जीवन जगत होते. संपूर्ण कुटुंबामध्ये एकही व्यक्ती शाळेमध्ये गेलेली नव्हती. परंतु अशिक्षित असूनही चतुराई, धिटपणा, बुद्धीचातुर्य हे बाईकडे होते. शेतीत कामे करायची, डोंगरामध्ये जनावरे चारण्यासाठी जात असे , हा बाईचा दररोजचा नित्य नियम असायचा.
आई- वडिलांनी बाईचे लग्न १९५६ मध्ये गावातीलच दशरथ दौंड यांचा मुलगा ज्ञानोबा दौंड यांच्याशी करून दिले.ज्ञानोबा यांचे शिक्षण इ. ७ वी पर्यंत झालेले होते. अध्यापनाचे प्रशिक्षण सातारा येथे कर्मवीर भाऊराव अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 'कमवा व शिका' योजनेखाली घेऊन त्यांची व्हॉलंटरी शिक्षक म्हणून अधोडी दिवटे या गावी सेवेला सुरुवात झाली. पुढील नोकरी लोकल बोर्ड मध्ये १९६० मध्ये रूपांतरीत होऊन सेवेला आणि संसाराला सुरुवात झाली.
एकत्रित कुटुंब त्यामुळे बाई कोनोशी गावी राहायची आणि वडील नोकरीच्या ठिकाणी राहायचे. बाई गावाकडे असतांना त्या काळामध्ये चुलत्यांचा गावामध्ये खूप मोठा दरारा असायचा. सर्वांचा आदर करत. बाईला प्रचंड कामे पडत असत, बाई सतत शेतामध्ये सकाळ-संध्याकाळ कामे करायची. वडील शनिवारी, रविवारी सुट्टीला गावाकडे यायचे. वडील मोट हकायचे तर बाई दारे धरत असायची जनावरे राखणं, शेतात खूरपने , शेळ्या कडे जाणे, मजुरा सोबत दिवसभर शेतीची कामे करणे हा बाईचा दररोजचा नित्य नियम असे. दररोजच्या कामा सोबत वडिलांना साथ देणे हे बाई स्वतःचे कर्तव्य समजत असे. बाईने आम्हा तिघा भावंडांना काकासाहेब, दिलीप आणि अशोक यांना जन्म दिला.
१९६३ मध्ये आधोडीवरून वडिलांची बदली मोहोज देवढे या गावी झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, शासनाचे विविध उपक्रम राबवणे, संध्याकाळी अभ्यासिका घेणे, प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणे, ही वडिलांची वैशिष्ट्ये होती. वडिलांनी बाईला मोहोज देवढे या ठिकाणी सोबत नेले. बाईचा स्वयंपाक सकाळीच होत असे. दिवसभर काय करायचे म्हणून बाई दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करायची. माझे पती शिक्षक आहेत. मी इतरांच्या शेतात जाऊन कशी काम करू, याचा बाईला कधीही संकोच वाटला नाही. १९७२ च्या दुष्काळामध्ये शासनाने रोजगार हमीची अनेक कामे उपलब्ध केली. बाई माझ्यासहित अनेक वेळा इतरांच्या शेतामध्ये; तसेच मोहोज देवढे ते अकोला रस्त्यावर खडी फोडण्यासाठी जायची.मीही तिच्या सोबत जाऊन बाईला मिळालेली सुकडी घेऊन यायचो आणि सुकडी भाजून आम्ही सर्व भावंडे एकत्रित बसून खाण्याची मजा लुटत असत.
काकासाहेबचे शिक्षण पाथर्डी येथे श्री तिलोक जैन विद्यालयात सुरू झाले. बाई सकाळीच साडेसात वाजता डब्बा करायची मी आणि दिलीप तो डब्बा पोस्टमन चित्र असलेल्या चौकोनी आकाराच्या लोखंडी डब्यामध्ये ठेवायचो .डब्बा एस.टी.मध्ये ठेवण्यासाठी आमचे अधून मधून भांडणे होत असायचे. बाई आमच्या पाळ्या लावत असायची. पाथर्डीहून डब्बा आल्यानंतर त्यामध्ये काही आले आहे का ? त्यासाठी आम्ही आवर्जून त्या डब्यामध्ये डोकावत असत.कधी लेमन गोळी तर कधी चिठ्ठी निघायची. खूप मजा येत असतं. एकदा गावामध्ये डोळे येऊ नयेत, म्हणून उदबत्तीने डोळे डागनारा माणूस गावात आला आणि बाईने माझे डोळे पापण्याच्या वरील बाजूस दुपारी दोन वाजता डागून घेतले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत माझे डोळे खूप सुजले वडील आले तेव्हा बाईला वडील खूप भांडले मला वेदना होत होत्या. बाईला तीची चूक लक्षात आली परंतु काय असं कोण जाणे,आज तागायत माझे डोळे अद्याप पर्यंत आले नाहीत. खरे तर आजच्या विज्ञान युगामध्ये याला काय म्हणावे हे कळत नाही.
जांभळी तसेच इतर गावावरून शाळेत आलेले विद्यार्थी यांना बाई सतत आदराने जेवण देत असायची. शिक्षणामध्ये ज्या गोष्टींची अपूर्तता असेल, त्या त्या गोष्टी वडील पूर्ण करायचे. १९७८ मध्ये वडिलांची बदली सोनोशी या गावी झाली. बाई कोनोशीला राहू लागली.
आम्ही तिन्ही भावंडे शिक्षणासाठी बाहेरगावी पडलो. आम्ही खूप मोठे व्हावे हे बाईचे स्वप्न असायचे; म्हणून बाईने आमच्यासाठी रानातला रानमेवा, तसेच आम्ही शिक्षणाच्य ठिकाणी हाताने स्वयंपाक करून खात असल्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व शिधा- साहित्य आम्हाला तयार करून देत असे. शेतीची कामे करणाऱ्या मजुरांना जेवण तयार करणे त्यांचे जेवण शेतात पोहोच करणे , उन्हाळ्यात ओले-काचे (पापड्या) करणे, त्या सलादामध्ये ठेवणे,धान्यांच्या कणगी भरून ठेवणे, भावकीच्या लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमामध्ये हिरीरीने भाग घेणे हे बाई सहजरित्या करत असे.
एकदा १९८३ मध्ये कॉलेजला असताना मी राऊंड कंगवा आणला आणि देवळीमध्ये ठेवला बाईने भावांना विचारले हे काय आहे. काकासाहेब आणि दिलीप यांनी सांगितले हा त्याचा दात घासायचा ब्रश आहे. अशा अनेक गंमती जंमती आम्ही तिघे भावंडे बाईच्या बाबतीत करत असायचो.
पुढे वडिलांची बदली चुंबळी आणि नंतर भावी निमगाव या ठिकाणी झाली ते तेथे एकटे राहात असत शेवटी भावी निमगाव या गावानंतर वडील सेवानिवृत्त होऊन ते गावाकडे राहण्यासाठी आले.
वडील परगावी असतांना गावकडील संपूर्ण जबाबदारी बाई पार पाडत असे , बाईने आम्हाला सतत प्रोत्साहन दिले . दिवस असो की रात्र ती आमच्यासाठी कष्ट करायची तिचे प्रत्येक काम , चिकाटी, भक्ती , समर्पन, आचरण आमचे साठी प्रेरणास्थान आहे. तिच्या आशीर्वादाने आम्ही तिन्ही भावंडे आज सुखी समाधानी आहोत. काकासाहेब शिक्षकी पेशातून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून त्याचे दोन्ही मुले आणि सुना डॉक्टर आहेत. दिलीप शिकलेला नसला तरी त्याची दोन्ही मुले शिक्षक आहेत. मीही नामांकित अशा श्री तिलोक जैन विद्यालयात प्राचार्य या पदावर कार्यरत असून माझी ही दोन्ही मुले इंजिनियर आहेत.खऱ्या अर्थाने हे सर्व घडवण्यामध्ये बाईंचे अतुलनीय कार्य आहे. म्हणून आज या दशक्रिया विधी निमित्ताने तिन्ही भावांना सात मुले आहेत. आमचे कुलदैवत ' सप्तऋषी' असल्यामूळे सात झाडे लावत आहोत . जेणेकरून आमची पुढील पिढी या ठिकाणी एकत्र येऊन झाडाखाली बसून डबे खाईल. आणि ही आमच्या आजीच्या प्रीत्यर्थ लावलेली झाडे आहेत. हे त्यांच्या स्मरणात राहील आणि त्यांनाही समाजासाठी झाडे लावण्या बाबतची प्रेरणा निर्माण होईल. आज आईच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झालेली आहे. परमेश्वर आम्हाला सद्बुद्धी देवो. बाईला भावपूर्ण श्रद्धांजली
-अशोक दौंड,प्राचार्य
श्री तिलोक जैन उच्च मा.विद्यालय, पाथर्डी जि.अ. नगर.
Tags :
21876
10





