पोलिस उपअधीक्षक पद रिक्तच ; उपविभागातील जनतेची गैरसोय; त्वरित नेमणुकीची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांपासून शेवगाव पोलिस उपविभागीय अधिकारीपद रिक्तच आहे. त्याअंतर्गत पाचही पोलिस ठाण्यांअंतर्गत तक्रारदारांना वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची भेट मिळणे मुश्किल बनले आहे.
नगर भाग व श्रीरामपूर उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकांकडे या विभागाचा प्रभारी कार्यभार विभागून देण्यात आला आहे. जनतेच्या द़ृष्टीने ते गैरसोयीची ठरत असून, शेवगाव विभागास पोलिस अधिकार्यांची त्वरित नेमणूक करण्याची मागणी होत आहे.
शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गंत शेवगावसह नेवासा, शनिशिंगणापूर, सोनई व पाथर्डी या पाच पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. सहा महिन्यांपूर्वी शेवगाव विभागाचे पोलिस तत्कालीन उपअधीक्षक सुदर्शन मुंडे सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून शेवगावचे उपअधीक्षकपद रिक्तच आहे. त्यात नेवाशासह तालुक्यातील शनिशिंगणापूर व सोनई पोलिस ठाण्यांसाठी श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे उपअधीक्षक पदाचा प्रभार देण्यात आला आहे.
श्रीरामपूर उपविभागाचा कार्यभार सांभाळून नेवाशातील तीन पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळणे त्यांनाही त्रासदायक ठरत आहे. शेवगाव व पाथर्डी पोलिस ठाण्यांचा प्रभारी कार्यभार नगर भाग उपविभागीय अधिकार्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यासाठी शेवगाव व पाथर्डीकरांना नगर, तर नेवासकरांना श्रीरामपूरला जावे लागते.सहा महिन्यांपासून उपअधीक्षकपदच रिक्त असल्याने व कायमस्वरुपी उपअधीक्षक नसल्याने त्यांचा कामकाजावर परिणाम होत आहे. याबाबत कोणी आवाज उठविताना दिसत नाही. गृह विभागाने हे पद तातडीने भरावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.