पाथर्डी-राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या आंदोलनाला हिंसक वळण
पाथर्डी- प्रतिनिधी
आंदोलनाला हिंसक वळण
आमदार निलेश लंके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची अज्ञात आंदोलकांनी पेटवली.यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील नाईक चौक येथे भाजप वगळता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कार्यकर्त्यांनी पाथर्डी मध्ये जाळपोळ केली. राष्ट्रीय महामार्गाचा कार्यालयातील खुर्च्या कार्यकर्त्यांनी ऑफिसच्या बाहेर आणून त्या पेटवून दिल्या. इतकेच नाही तर शहरातील विविध रस्त्यांवर टायर पेटवून रस्ता बंद करण्याचा देखील प्रयत्न केला.दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने आज मात्र हिंसक वळण घेतले.