महाराष्ट्र
पाथर्डी- अपघात प्रवण क्षेत्र ब्लॅक स्पॉट' घोषित
By Admin
अपघात प्रवण क्षेत्र ब्लॅक स्पॉट' घोषित करुन अपघात होणार नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या जाणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी,शेवगाव,राहुरी,संगमनेर,पारनेर, श्रीगोंदा,जामखेड,कर्जेत,नेवासा तसेच जिल्ह्यातील अनेक मार्गांवर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आता परिवहन, पोलिस, बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग या विभागांनी मोहीम हाती घेतली आहे.
जिल्ह्यात ज्या स्पॉटवर गेल्या तीन वर्षांत पाच अपघात किंवा त्या अपघातांत दहा जण ठार झाले, त्या स्पॉटला 'ब्लॅक स्पॉट' घोषित करून त्या ठिकाणी यापुढील काळात अपघात होणार नाहीत, याविषयी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांच्या आधिपत्याखाली पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील 'ब्लॅक स्पॉट'ची ड्रोनद्वारे पाहणी परिवहन विभागातील अधिकारी श्याम चौधरी, संकेत मारवाडी, विलास डूम, सुरेश उबाळे, दत्ता शिंदे यांनी केली.
या पाहणीतून, नेहमी याच ठिकाणी का अपघात होतात, याचे कारण शोधून त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, हे परिवहन विभाग आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अध्यक्ष असलेल्या रस्ता सुरक्षा समितीला सादर करणार आहे.
त्यानंतर उपाययोजना केल्या जाणार आहेत. अनेक रस्त्यांवर असलेले खड्डे, धोकादायक वळणे, अरुंद रस्ता यांमुळे अपघात होतात. धोकादायक वळणे काढून टाकणे, खड्डे बुजविणे, रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, स्पीड ब्रेकर बसविणे, अशा उपाययोजना केल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.
परिवहन विभागाने सध्या जिल्ह्यातील नगर ते पुणे, औरंगाबाद, कल्याण, मनमाड, कल्याण निर्मल या मार्गांवरील 'ब्लॅक स्पॉट' निश्चित केले असून, या मोहिमेची सुरवात १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा उपक्रम पूर्ण करण्यात येऊन त्यानंतर उपाययोजना केल्या जाणार असल्याने, आता ठरावीक ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे.
ड्रोनद्वारे तपासणी
अनेक मार्गांवर ठरावीक ठिकाणीच अपघात होतात.
'ब्लॅक स्पॉट'ची ड्रोनद्वारे तपासणी केली जात आहे.
अपघातस्थळांची यादी पोलिसांकडून परिवहन विभागाला सादर
अपघात टाळण्यासाठी 'ब्लॅक स्पॉट' सुधारणा मोहीम हाती.
आम्ही सध्या जिल्ह्यातील अनेक 'ब्लॅक स्पॉट'ची निश्चिती केली असून, या संदर्भातील अहवाल रस्ता सुरक्षा समितीला सदर करणार आहोत. त्यानंतर उपाययोजना होऊन अपघातांना निश्चित आळा बसेल व प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.
- ऊर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर
Tags :
734030
10