महाराष्ट्र
कार्ले खिंड पात्रूदेवी मंदिरातील चोरीचा लागला छडा, पोलिसांनी ४८ तासांत आवळल्या चोरांच्या मुसक्या
By Admin
कार्ले खिंड पात्रूदेवी मंदिरातील चोरीचा लागला छडा, पोलिसांनी ४८ तासांत आवळल्या चोरांच्या मुसक्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अलिबाग कार्ले खिंड येथील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या पात्रू देवी मंदिरातील चोरीचा छडा लागला असून आरोपीला ४८ तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरीला गेलेला मुद्देमाल ही चोरट्या करून हस्तगत केला आहे. दिलीप घोडके राहणार पाथर्डी, अहमदनगर असे अटक झालेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांनी आरोपीला एका गुन्ह्यात अटक केली असून अलिबागला आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. या चोरी प्रकरणात अजून काही आरोपी असण्याची शक्यता आहे. आरोपीला आणल्यानंतर यात अजून कोण सहभागी होते याची माहिती मिळणार आहे.
अलिबाग कार्ले खिंड येथे पुरातन पात्रूदेवी मंदिर आहे. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. ११ ते १२ जानेवारी या कालावधीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आधी मंदिरात मद्य प्राशन करून त्यानंतर मंदिरातील मूर्ती आणि आतील सामानावर ७ हजार ८०० रुपयाच्या मुद्दे मालावर डल्ला मारून कारने पसार झाले. या घटनेने भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. चोरी प्रकरणाबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
चौल येथील दत्त मंदिरातील चोरीचा सुगावा अद्याप लागला नसताना पात्रूदेवी मंदिरात झालेल्या चोरीने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस आणि त्याच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. जिल्ह्यासह राज्यातील पोलिसांच्या गृपवर या चोरी बाबत माहिती अलिबाग पोलिसांनी पाठवली होती. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांनी एका गुन्ह्यात आरोपीला अटक केली होती. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अलिबाग कार्ले खिंड येथे मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार चाळीस गाव पोलिसांनी अलिबाग पोलिसांना मुद्देमाल गेल्याची माहिती पाठवून दिलीप घोडके यास अटक केल्याचे कळविले. आरोपी याच्या कडून चोरीला नेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अलिबाग आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीला आणल्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या साथीदाराची माहिती मिळू शकेल असे सणस यांनी सांगितले. अलिबाग पोलिसांनी चोरी नंतर त्वरित माहिती राज्यातील पोलिसांना पाठविल्याने चोराला अटक करण्यात यश आले आहे.
Tags :
56215
10