महाराष्ट्र
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध ; पाथर्डी, नेवाशात तहसीलदारांना निवेदन
By Admin
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध ; पाथर्डी, नेवाशात तहसीलदारांना निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा पाथर्डी तालुका महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. हे निलंबन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसिलदार मुरलीधर बागूल यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी, बेरोजगारी, तसेच कर्नाटक सीमा वादाच्या मुद्यावर राज्य सरकारला जाब विचारला होता. त्याचप्रमाणे ठप्प झालेली राज्यातील विविध विकासकामे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील उद्योग दुसर्या राज्यांत जात आहेत. या विविध मुद्यांवर पाटील यांनी सातत्याने आवाज उठविला आहे.
त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकारची राज्यातील जनतेपुढे पूर्णपणे बेअब्रू झाली. तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याशी संबंध असलेला कथित नागपूर सुधार न्यासमधील करोडोंचा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला. या सर्व गोष्टींचा राग म्हणून या सरकारने जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली. याचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्यावरील कारवाई तातडीने मागे घेऊन, नागपूर सुधार न्यासमधील कथित घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना तालुकप्रमुख भगवानराव दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, चंद्रकांत भापकर, देवा पवार, चांद मनियार, सीताराम बोरुडे, सचिन नागापुरे, राजेंद्र बोरुडे, शुभम वाघमारे, अक्रम आतार, अनिकेत निनगुरकर, विकास दिनकर, आदर्श काकडे, स्वप्निल चौधरी आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
राज्य सरकारचा अपयश झाकण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन म्हणजे सरकारचा स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.23) निषेधसभा घेण्यात आली. त्याप्रसंगी माजी आमदार अभंग बोलत होते. हिवाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत आणि बेळगाव सीमावादावरील लक्ष विचलित करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष पाटील यांना निलंबित केल्यांचा आरोप त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा गंडाळ, रामदास गोल्हार, डॉ. अशोकराव ढगे यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे, जनार्दन पटारे, शहराध्यक्ष कृष्णा गायकवाड, योगेश रासने, भैय्या कावरे, बाळासाहेब आरगडे, पप्पू पवार, अर्जुन कापसे यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags :
200347
10