महाराष्ट्र
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज - प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
By Admin
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज - प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
पाथर्डी - प्रतिनिधी
बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील इतिहास विभाग व महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीने गांधी जयंती निमित्त प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
जगातील प्रगत देशांनी गांधी विचारांचा स्वीकार करून विकास साध्य केलेला आहे. प्रशासन चालविण्यासाठी व लोक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी गांधीजींच्या विचारांचा वापर विविध देशांनी केलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतांना स्वातंत्र्य चळवळीतील गांधीजींचे योगदान आणि गांधी विचार कसे दिशादर्शक आहेत, याचा धावता आढावा त्यांनी घेतला. त्याचबरोबर महात्मा गांधींनी स्वीकारलेल्या सत्य अहिंसा व सत्याग्रह या तत्त्वाचा स्वीकार करणे, आज आपल्या देशाला आवश्यक आहे. त्यांच्या तत्वानुसार आपल्या देशाची प्रगती शक्य आहे. आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर गांधीजीच्या तत्त्वाप्रमाणे चालणे गरजेचे आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनात विविध आंदोलने केली, परंतु अहिंसेला कधी थारा दिला नाही. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सर्व भारतीय जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात बहुमोल योगदान दिले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला असे प्रतिपादन डॉ. अली मिर्झा यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना तरुण पिढी व किशोरवयीन मुले हिंसेच्या आहारी जाऊन स्वतःचे व समाजाचे नुकसान करत आहेत. ज्यांनी हिंसेच्या मार्गाने दहशत निर्माण केली त्यांचा विनाश झाला. म्हणून सर्वांगीण शाश्वत विकास साध्य करण्यासाठी गांधी विचारच उपयोगी ठरणारे आहे तसेच तरुण पिढीने अभ्यास करून स्वतःचा विकास करणे आवश्यक आहे. कोणत्याही मोहाला बळी न पडता आपले शरीर निरोगी ठेवून व्यायाम करावा, करियर घडावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी महात्मा गांधीजीं सारख्या महापुरुषांचे विचार राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी कसे दिशादर्शक ठरतात, यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीचे विचार आत्मसात करावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.अशोक कानडे, डॉ. सुभाष शेकडे, डॉ. बबन चौरे,महाविद्यालयाचे प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी केले. सूत्रसंचालन गांधी अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डाॅ. अर्जुन केरकळ यांनी केले. तर आभार प्रा. सुरेखा चेमटे यांनी मानले.
Tags :
5473
10