महाराष्ट्र
खुषखबर..! ‘अखेर’ महिनाभराच्या विलंबाने भंडारदरा धरण ओव्हरफ्लो!
By Admin
खुषखबर..! ‘अखेर’ महिनाभराच्या विलंबाने भंडारदरा धरण ओव्हरफ्लो!
धरणातून सव्वा तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा..
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लहरी पावसामुळे बहुतेक वेळा 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा खंडित झालेला भंडारदरा जलाशय महिनाभराच्या विश्रांतीनंतर ‘अखेर’ आज (ता.12) सकाळी 11 वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 3 हजार 256 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणात याच गतीने पाण्याची आवक सुरु असल्याने पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. महिन्याभराच्या विलंबाने का होईना भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेळेवर आगमन झालेल्या मान्सूनने अल्पावधीतच धरणक्षेत्रासक्ष लाभक्षेत्रातूनही काढता पाय घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रदीर्घ विश्रांतीनंतर 19 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पाणलोटासह लाभक्षेत्रात सर्वदूर मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले. त्यातच जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटातील पावसाची संततधार टिकून राहिल्याने ऑगस्ट उजेडता उजेडता या तीनही धरणातील पाणीसाठे समाधानकारक अवस्थेत पोहोचले. अवघ्या दहा दिवसात जिल्ह्यातील धरणांची स्थिती बदलल्याने बहुतेक वेळा 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा भंडारदारा यंदाही गाठेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा दडी मारल्याने धरणातील साठे टप्प्याटप्प्याने स्थिर झाले. यादरम्यान धरणातील पाण्याची आवकही पूर्णतः थांबली होती.
मात्र गेल्या 8 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर पुनरागमन करणाऱ्या पावसाने विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केल्याने अवघ्या दोनच दिवसात भंडारदरा धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यातून शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धरणाने 10 हजार 500 दशलक्ष घनफूट ही आपली तांत्रिक पातळीही गाठली. त्यामुळे पावसाचा जोर टिकून राहिल्यास पुढील बारा ते अठरा तासात भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यताही निर्माण झाली. त्याप्रमाणे आज (ता.12) सकाळी 11 वाजता भंडारदरा धरणाने 11 हजार 39 दशलक्ष घनफूट ही आपली संपूर्ण पातळी गाठल्याचे भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांनी जाहीर केले.
सकाळी 11 वाजेपासून धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार 436 क्युसेक्स तर विद्युतगृह क्रमांक एक मधून 820 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रातून सध्या 3 हजार 256 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत असून सद्यस्थितीत सदरचे पाणी निळवंडे धरणात अडविले जात आहे. सध्या निळवंडे धरणाचा पाणीसाठा 85 टक्के झाला असून पावसाचा अंदाज घेत व भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गानुसार निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने येत्या काही तासात निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे अथवा निळवंडे धरणाची पाणी पातळी 90 टक्क्यांवर नियंत्रित ठेवून पाण्याची आवक होत असलेल्या प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनाने प्रवरा नदीच्या काठावरील गावांना अती सावधानतेचा इशारा दिला आहे.
Tags :
478
10