शेतकरीच करणार आपल्या पिकांच्या नोंदी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार असून पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली सरकारी योजनांचा चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे, हे प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याने पारनेर येथे तरवाडीमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन ई पीक पाहणी डेपो संदर्भात खातेदारांना प्रशिक्षण प्रांत अधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
‘माझे शेत माझा सातबारा मीच लिहिणार माझा पीक पेरा’ या मोहिमेंतर्गत यापुढे शेतकरी स्वतःची पीक पाहणी स्वतः अचूक रित्या नोंदवू शकणार आहे. मागील काही दशकात तलाठी यांच्याकडील वाढता कामाचा बोजा विचारात घेता, पिकाच्या नोंदी करण्यासाठी त्यांना आटोकाट परिश्रम करावे लागतात. तलाठ्यांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपच्या साह्याने स्वतः स्वतःची पीक पेरणीची माहिती ऑनलाइन द्वारे नोंदवल्यानंतर ती माहिती सातबारा उताऱ्यावर दिसणार आहे.