खाजगी रुग्णालयात होतेय लुटमार,मरणापेक्षा उपचाराचा ञास रुग्णांना जास्त
By Admin
खाजगी रुग्णालयांत लुटमार, मरणापेक्षा उपचाराचा ञास रुग्णांना जास्त
रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातलग झाले कर्जबाजारी, प्रशासनाचे कागदी घोडे सुरूच
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 03 मे 2021 सोमवार
कोरोना आजाराने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असताना शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याचा लाभ खाजगी रुग्णालयांनी घेतला आहे. ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड नसल्याचे सांगत खाजगी रुग्णालय चालकांनी बाहेरून बंद तर आतून सुरू असल्याचा बनाव सुरू केला आहे. अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना बेड नाकारले जाते. परंतु मोठा वशिला व पैसा दाखविताच रुग्णालयात जागा मिळते. खाजगी रुग्णालय चालकांच्या पैसा लूट उपचारामुळे कोरोना रुग्णांना मरणापेक्षाही अधिक यातना सहन कराव्या लागत असल्याचे दुर्देवी चित्र आहे.
नगर जिल्ह्यामध्ये दर दिवशी 4 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामिण भागात तर कोरोना रुग्ण संख्येने मोठा उच्चांक घेतला आहे. मृत्यु संख्याही वाढल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात भयभित झाले आहे. कोरोना आजाराचा विळखा तर दुसरीकडे महागड्या उपचारामुळे सर्वसामान्यांपुढे यमदेवतेपुढे शरणागती पत्कारण्याची नामुष्की ओढावत आहे. घरी आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी जाण्यासाठी कोरोना अहवाल गरजेचा बनल आहे. शासकीय यंत्रणेकडे शेकडोंची गर्दी असल्याने खाजगी लॅबमध्ये पैसे देऊन कोरोन चाचणी करावी लागते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर एचआरसीटी स्कॅन केल्याशिवाय औषधोपचार करता येणार नसल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात अत्यल्प ठिकाणी एचआरसीटी स्कॅन व्यवस्था असल्याने दोन ते तीन दिवस स्कॅन करून घेण्यासाठी नंबर लावावे लागते. तो पर्यंत आजारही वाढत जातो. या सर्व व्यवस्थेमध्ये रुग्णाची मोठी फरफट होते. वैद्यकीय सुचनेनुसार सर्व चाचण्या करून झाल्यानंतर कोरोना अहवाल व स्कॅन पाहिल्यानंतर रुग्णाला कोणत्याही क्षणी ऑक्सिजनची गरज भासेल. शक्यतो ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या कोव्हीड सेंटर ठिकाणीच रुग्णास नेण्याचा सल्ला दिला जातो.
जिल्हाभर रुग्णाला सोबत घेऊन ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर उपलब्ध असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये जागेची शोध घेण्याची परिक्षा सुरू होते. रुग्णाला आमच्या रुग्णालयात जागाच नाही असे फलक जवळपास सर्वच खाजगी रुग्णालयांमध्ये लावलेले दिसतात. त्यामुळे रुग्ण उपचार होण्यापूर्वीच अत्यवस्थ होऊन मरणाच्या दारात पोहोचतो. रुग्णाची अवस्था पाहून नातलगही घाबरतात. वाटेल तेवढे पैसे घ्या, परंतु आमच्या रुग्णाला वाचवा असे नातलगाने सांगताच रुग्णालयात जागा उपलब्ध होते. वाटेल तेवढ पैसे घ्या या शब्दावर रुग्णालयामध्ये 50 हजार ते 1 लाखा पर्यंत अॅडव्हान्स रक्कम भरून घेतली जाते. शासकीय आदेशानुसार व्हेंटीलेटर असलेल्या आयसीयूचे सर्वाधिक दर हे 9 हजारापर्यंत ठरलेले आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये 25 हजार रूपयांपर्यंत आयसीयूचे रुम भाडे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे. त्यातच दैनंदिन 10 ते 20 हजार रूपयांचे महागडे औषधे आणण्याचा सल्ला, त्यामध्येही रुग्ण अजून अत्यवस्थ झाल्यानंतर नातेवाईकांच्या हातामध्ये रेमडिसिव्हिर औषध आणण्यासाठी चिठ्ठी दिली जाते. रेमडिसिव्हिर दिल्याशिवाय रुग्ण जगणार नाही असे सांगितले जात असल्याने ते औषधही काळ्या बाजाराने खरेदी करावे लागते. 20 ते 30 हजार रूपयांमध्ये काळ्या बाजाराने रेमडिसिव्हिर आणल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याने महागडी औषधांचा डोस द्यावे लागत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे नातलगांना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागतो तर रुग्णालाही जीव वाचविण्यासाठी कोरोना आजारासह हृदयाचे आजार व साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी महागडी औषधांना पचविण्यासाठी मोठा धीर धरावा लागतो. रुग्णाने उपचारा दरम्यान धीर धरल्यास जीव वाचतो. परंतु रुग्णालयातील यंत्रणा व महागडी औषधांचा डोस घेतल्यानंतर अनेक रुग्ण धास्तीने जीव सोडत असल्याच्याही चर्चा आहे. यामुळे लाखो रूपये खर्च केल्यानंतरही अनेक नातलगांच्या हाती निराशाच येत आहे.
याबाबत शासकीय प्रशासन मात्र, कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे. खाजगी रुग्णालय चालकांना दर पत्रक ठरवून दिले असून त्यानुसारच ते बिल आकारत असल्याचा बनाव शासकीय यंत्रणा दाखवित आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये कोरोना आजाराची भिती दाखवून खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली लाखो रूपयांची लूट प्रशासनाला दिसत नसल्याची चर्चा आहे.
------
तक्रारी आल्यानंतर नक्की कारवाई करू- तहसीलदार उमेश पाटील
------
नगर शहर व परिसरातील खाजगी रुग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा बील वसुली केली जात असल्याबाबत तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी चर्चा कली असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑडिटर नेमण्यात आले आहे. अधिक बील वसूल केले असल्यास त्याची तक्रार प्रशासनाकडे बीलासह सादर करावी.संकट काळात टाळूवरील लोणी खाणार्यांचा नक्की बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले.
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)