टरबूज व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना गंडवले,चार लाख सात हजार 500 रुपयांचा धनादेश देवून लुटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -23 एप्रिल 2021
राहुरी तालुक्यातील घटना
कुरणवाडी येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज एका व्यापाऱ्याने खरेदी केली. त्यापोटी व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांना चार लाख सात हजार 500 रुपयांचे धनादेश दिले. शेतकऱ्यांनी धनादेश बॅंकेत भरले असता ते वटले नाहीत. याबाबत एका शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी सर्जेराव संताजी केदार (रा. कुरणवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अकबर कालू शेख (रा. अस्तगाव फाटा, ता. राहाता) याने 13 जून 2020 रोजी माझ्या शेतातील 59.5 टन, तसेच दत्तात्रेय सीताराम खिलारी (रा. कुरणवाडी) यांच्या शेतातील साडेआठ टन टरबूज खरेदी केली.
त्यापोटी दोन बॅंकांचे धनादेश दिले. मात्र खात्यावर पैसे नसल्याने दोन्ही बॅंकांचे धनादेश वटले नाहीत. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊ नका.
तुमचे पैसे देतो, असे सांगून व्यापारी शेख याने वेळकाढूपणा केला. केदार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.