कोरोनाचा कहर, शहरातून थेट बांधावर..!
By Admin
कोरोनाचा कहर शहरातून थेट बांधावर ! ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्येत वाढत
नगर सिटीझन live टिम प्रतिनियधी - 25 एप्रिल 2021
मागीलवर्षी लक्षणीयरीत्या शहरी जीवन विस्कळीत केल्यानंतर यावर्षी कोरोना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला आहे. अनेक मध्यमवर्गीय शहरांमधून गावाकडे परतले आहेत. त्यामुळे गावांमध्ये गर्दी झाल्याने गावातील नागरिक शेतांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. यातूनच शेतांमधील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. शेतकरी तसेच शेतमजूरही आता 'क्वारंटाइन' झाले असल्याने शेतीच्या कामांचे वेळापत्रक बिघडले आहे.
भीमापट्ट्यातील काही गावांचा अपवाद वगळता सर्वच गावे तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातील अनेक गावे तर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' बनली आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी खेड्यापाड्यात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या अंमलबजावणीमध्ये शेतीशी संबंधित व्यवसायांना काही प्रमाणात मुभा असली तरी, शेतकरी तसेच शेतमजूरांकडून नियमावलीचे काटेकोर पालन होत नसल्याचे दिसते. त्याचप्रमाणे शेतातील बहुतांश कामे ही शेतकरी स्वतः करू शकत नाहीत. त्यामुळे या कामांसाठी शेतमजुरांची आवश्यकता असते. त्यातूनच गावोगावी शेतमजुरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या अनेक ठिकाणी कामे करत असतात.
पॉझिटीव्ह'मुळे मजूर मिळेना...
शेतमजुरांच्या टोळ्या असल्या तरी एखाद्या शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असली तरीही आणि बरी झाल्यानंतरसुद्धा त्या शेतकऱ्याकडे मजुरी करण्यासाठी कुणी धजावत नाही. त्यामुळे मजुरांअभावी शेतातील कामांचे वेळापत्रक बिघडले आहे.
गावे-वाड्या 'हॉटस्पॉट'...
भीमा नदीकाठावरील मोठ्या बाजारपेठा असलेली गावे तसेच वाड्या-वस्त्या देखील आता कोरोनाच्या 'हॉटस्पॉट' झाले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करताना मात्र कुणीही दिसत नाही. निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे भासमान चित्र नागरीकांकडून तयार केले जात आहे.

