चालकावर चाकूहल्ला; कार लांबविली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिवीगाळ केल्याचे म्हणत तिघा प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करून जबर जखमी केले. रोख रक्कम, मोबाईल व कार जबरीने पळवून नेण्याची घटना घडली.
शिवाजी अभिमन्यू वाघमारे (वय 40 हल्ली रा. कोंढवा पुणे) हे नगर-पाथर्डी रस्त्यावर प्रवास करीत असताना त्यांच्या कारमध्ये तीन अनोळखी प्रवासी बसले होते. दि.12 रोजी रात्री तीन वाजता तालुक्यातील निवडुंगे शिवारात कार आली. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या एकाने थांबायचे सांगितले, त्यावेळी कार शेतात घेण्यास सांगितले, कार खाली घेतल्यानंतर एकाचा फोन चालू होता. यावेळी अनोळखी प्रवासी वाघमारे यांना आमची आत्या येथे येते. दहा मिनिटे थांब, असे सांगितले. त्यानंतर आम्हाला शिव्या का दिल्या, असे म्हणत आरोपीनी चाकू काढला व दुसर्याने वाघमारे यांच्या गळ्यात मफलर टाकून मागे ओढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांच्यात झटापट झाली. आरोपींनी चालक वाघमारे यांच्या दोन्ही हातावर चाकूने वार करून जबर जखमी केले. वाघमारे यांना कारच्या खाली ढकलून शेतात टाकले. नंतर मफलर आणि फाटलेल्या शर्टने हात, पाय बांधत तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. या आरोपीनी चालक वाघमारे यांच्या खिश्यातील 10 हजार रूपये, दोन मोबाईल व कार असा एकूण सहा लाख 51 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कौशल्य राम निरंजन वाघ करीत आहेत. औरंगाबाद येथून पुण्याकडे जाण्यासाठी चालक वाघमारे हे तिघांना प्रवाशाला घेऊन निघाले होते. मात्र पांढरीपूल आल्यानंतर बनाव करून पाथर्डीकडे पाहुण्यांच्या घरी जायचे आहे असे सांगून चालक वाघमारे यांना येथून पाथर्डीकडे जाण्यासाठी सांगितले.