प्रेमविवाह केलेल्या तरुणीची सिंहगड रस्त्यावर गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रियकरासोबत वर्षभरापूर्वी घरातून पळून जाऊन आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खडकवासला येथे घडली आहे. प्रांजलचे दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर वर्षभरापूर्वी तिने घरच्यांचा विरोध असताना पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून ते दोघेही खडकवासला येथे राहत होते.
प्रांजल किसन रासकर( वय 22 सध्या रा. खडकवासला, मुळ रा. पिंपळनेर ता. पारनेर जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव असून तिने आत्महत्या नेमकी का केली असावी याबाबत हवेली पोलीस तपास करत आहेत.
काल रात्री उशिरा कामावरून आलेल्या पतीने अनेक वेळा घराचा दरवाजा वाजवला परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरमालकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी प्रांजल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलीसांनी घरात पाहणी केली परंतु आत्महत्येबाबत कसलीही चिठ्ठी आढळून आली नाही. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
याबाबत हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचे म्हणणे आहे कि, "तरुणीच्या आई-वडीलांशीही आम्ही संपर्क केला आहे. त्यांनी तरुणावर आरोप केले आहेत. आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलचे पॅटर्न लॉक बदलल्याने त्यातून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाईलमधील माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानुसार आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे."