प्रवरा नदीत बुडून माय-लेकीचा मृत्यू
नगर सिटीझन live
कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे घडली आहे. मयत आईचा मृतदेह त्याचदिवशी सापडला असून, बालिकेचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.
पूनम किरण भोसले (वय 27, रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता) व आर्या किरण भोसले (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. पूनम भोसले या त्यांच्या माहेरी वडील नारायण महादू संगारे यांच्याकडे म्हाळादेवीला आल्या होत्या. गुरुवारी दुपारी पूनम व त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमीलगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या, तर वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी दिसली नसल्याने त्यांनी शोधाशोध केली.
धोबी घाटावर शोध घेतला असता तेथे त्यांना माय-लेकीच्या चप्पल व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रवरा नदीत शोध घेतला असता, पूनम भोसले यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला; परंतु अंधार पडल्यामुळे बालिकेचा मृतदेह शोधण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविल्यानंतर आर्याचा मृतदेह सापडला. पोलीस पाटील अशोक संगारे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली आहे