महाराष्ट्र
पिस्तूल डोक्याला लावून तरुणाला बेदम मारहाण, ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग
By Admin
पिस्तूल डोक्याला लावून तरुणाला बेदम मारहाण, ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गावातील विकासकामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग आल्याने तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून, तोंडात औषध टाकून दोन वाहनांमधून आलेल्या गुंडांनी जबर मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकुरकडे जाणाऱया हिवरगाव पठार घाटात शुक्रवारी रात्री घडली आहे.
याप्रकरणी घारगाव पोलिसांत मुख्य 16 जणांसह इतर 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
सुनील नामदेव इघे (वय 39) असे मारहाण झालेल्याचे नाव असून, सुजित अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे, बाजीराव सतू खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, उमेश अशोक गाडेकर, गणपत बाळासाहेब पवार, किशोर बापू गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भगवान सुभाष शेंडगे, लखन सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्तात्रय सुभाष रेणुकादास, फिरोज सरदार पटेल, सुधीर सयाजी फटांगरे, कल्पेश गडगे (सर्व रा. साकुर, ता. संगमनेर) यांच्यासह इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकुर ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेस जोगेपठार येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याबाबत सुनील इघे यांनी ग्रामसेवकाला प्रश्न केला होता. यावर 'तुझा येथे बोलण्याचा काहीएक संबंध नाही, तू खाली बस', असे शंकर खेमनर म्हणाले. त्यामुळे इघे यांनी त्यांना समजावून सांगत माझा वैयक्तिक प्रश्न नाही, तो जनतेचा हक्क असल्याचे सांगितले. त्याचा राग येऊन शंकर खेमनर, इंद्रजित खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफिक चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार आणि ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी इघे यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच 'आमच्याविरुद्ध आवाज उठवला, तर तुला कायमचा संपवून टाकीन. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करू,' अशी धमकी दिली. याबाबत सुनील इघे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली. घारगाव पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता.
त्यानंतर रात्री इघे व त्यांचे दोन मित्र साकुरकडे परतत असताना हिवरगाव पठार घाटात दोन गाडय़ांमधून आलेल्या 20-25 जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. इघे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका मित्राचा मोबाईल या टोळक्याने हिसकावून घेतला. या गडबडीत त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मित्र घटनास्थळावरून गायब झाला. दूर गेल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी इघे यांना रुग्णालयात दाखल केले.
Tags :
1004953
10