राज्य सरकारने केलेली नुकसानभरपाईची घोषणा हवेतच, 70 हजार शेतकऱ्यांना मिळाला 42.64 कोटींचा पीकविमा
By Admin
राज्य सरकारने केलेली नुकसानभरपाईची घोषणा हवेतच, 70 हजार शेतकऱ्यांना मिळाला 42.64 कोटींचा पीकविमा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱयांची हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. याबाबतची नुकसानभरपाईपोटी अद्याप राज्य सरकारची मदत शेतकऱयांच्या पदरात अद्याप पडलेली नाही.
मात्र, प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील 42 कोटी 64 लाख 42 हजार रुपयांची भरपाईची रक्कम जिह्यातील 70 हजार 890 शेतकऱयांच्या खात्यावर मागील दहा दिवसांत वर्ग झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
नगर जिह्यात यंदा विक्रमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. मात्र, आता प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील मदत शेतकऱयांना मिळाली आहे. यात सर्वाधिक लाभ नेवासा तालुक्यातील शेतकऱयांना मिळाला असून, त्या खालोखाल शेवगाव, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यांत 11 कोटी ते पाच कोटींपर्यंत विम्याची मदत शेतकऱयांना मिळालेली आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री पीकविमा योजनेबाबत नगरसह राज्यभर तक्रारी होत्या. काही जिह्यांत कंपन्यांनी शेतकऱयांना कमी भरपाई दिली होती. त्यामुळे शेतकऱयांनी संबंधित कंपन्यांच्या तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर कंपनीकडून शेतकऱयांच्या तक्रारींची शहानिशा करून त्यांना कमी वेळात भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचा परिणाम म्हणून स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत जिह्यातील 70 हजार 890 शेतकऱयांना विमा कंपनीकडून 42 कोटी 64 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. गेल्या दहा दिवसांत विमा कंपनीकडून शेतकऱयांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
काढणी पश्चातच्या भरपाईची प्रतीक्षा
यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱयांची पिके शेतात पाण्यात सडून वाया गेली. यामुळे 20 हजार 250 शेतकऱयांनी काढणीपश्चातचा पीकविमा मिळावा, अशी मागणी केलेली आहे. ही भरपाईची प्रक्रिया किचकट असली, तरी उशिरा का होईना, शेतकऱयांना संबंधित विमा कंपनीकडून काढणी पश्चातचा पीकविमा मिळेल, अशी अपेक्षा कृषी अधीक्षक कार्यालयाला आहे.
तालुकानिहाय शेतकऱयांची संख्या आणि मिळालेली भरपाई
तालुका शेतकरी रक्कम
नेवासा 13,344 11 कोटी 38 लाख
शेवगाव 18,561 7 कोटी 60 लाख
राहता 7085 6 कोटी 66 लाख
कोपरगाव 6450 5 कोटी 4 लाख 17 हजार
श्रीरामपूर 2999 3 कोटी 3 लाख
पाथर्डी 1022 2 कोटी 84 लाख
राहुरी 3082 2 कोटी 55 लाख
जामखेड 3100 1 कोटी 5 लाख 90 हजार
नगर 1009 72 लाख 65 हजार
संगमनेर 1274 69 लाख 35 हजार
कर्जत 849 40 लाख 41 हजार
श्रीगोंदा 776 25 लाख 75 हजार
पारनेर 1079 21 लाख 78 हजार
अकोले 260 15 लाख 70 हजार