महाराष्ट्र
18596
10
वेठबिगारीसाठी मानवी तस्करी ; चार इसमांची सुटका
By Admin
वेठबिगारीसाठी मानवी तस्करी ; चार इसमांची सुटका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे वेठबिगारीसाठी मानवी तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करीत, चार इसमांची सुटका केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून, तीनजणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे वेठबिगारी करून घेणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ढवळगाव नजीक एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळून आला होता.
सदर घटनेचा तपास करत असताना श्रीगोंदा तालुक्यात काही जणांच्या टोळ्या मानवी तस्करी करून त्यांना डांबून ठेऊन मारहाण करीत वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून घरचे व शेतातील काम करून घेत असल्याचे, तसेच त्यांच्याकडून विविध रेल्वे स्थानकांवर भीक मागवून घेत आहेत, अशी माहिती बेलवंडी पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत मिळाली. असे वेठबिगार मयत झाल्यानंतर त्यांना पाण्यात किंवा बेवारसपणे टाकून दिले जाते. तसेच, असे वेठबिगार काही वीट भट्ट्यांवर आणि शेतातील बागेत कामावर असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना मिळाली. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपनिरीक्षक राजेंद्र चाटे आणि पोलिस कर्मचार्यांची स्वतंत्र तीन पथके तयार करून बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम सुरू केली.
शोधमोहीम सुरू असताना तालुक्यातील खरातवाडी येथे पिलाजी कैलास भोसले याच्याकडे काम करीत असलेल्या सलमान उर्फ करणकुमार (रा. छत्तीसगड) या इसमाची सुटका केली. घोटवी शिवारात बोडखे मळा येथे अमोल गिरीराज भोसले याच्याकडे ललन सुखदेव चोपाल (रा. बिहार) हा इसम आढळून आल्याने त्याची सुटका करण्यात आली. तसेच, घोटवी शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि जंग्या गफूर काळे यांच्याकडील इसम भाऊ हरिभाऊ मोरे (रा.अंबेजोगाई, बीड) याची त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
या आरोपींना अटक करून अधिक तपास केल्यावर त्यांनी यापूर्वी एका इसमास सुरोडी येथील मारूती गबुललाल चव्हाण यास 5 हजार रूपयांस विकल्याचे सांगितले.
सुरोडी शिवारात जाऊन खात्री करून शिव श्रीश (रा. कर्नाटक) या इसमाची सुटका करण्यात आली आहे. सदर आरोपींच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहायक उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे, मारूती कोळपे, हवालदार अजिनाथ खेडकर, ज्ञानेश्वर पठारे, भाऊ शिंदे, शरद कदम, शरद गागंर्डे, नंदू पठारे, संतोष धांडे, विनोद पवार, कैलास शिपणकर, संदीप दिवटे, सतीश शिंदे, सचिन पठारे, सोनवणे, सुरेखा वलवे यांनी केली.
Tags :
18596
10





