घरात निघालेल्या कोब्रा सापाचं जोडपं निसर्गात मुक्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहराजवळ असलेल्या चांदबीबी महाल परिसरातील शहापूर येथील एका घरात रविवारी दुपारी दोन क्रोबा जातीचे साप आढळून आले.
साप पाहून उपस्थितांना धडकी भरली. यावेळी मात्र सर्पमित्र कृष्णा बेरड यांनी मोठ्या कौशल्याने हे दोन्ही साप पकडून त्यांना निसर्गात मुक्त केले.
शहापूर येथील अशोक बेरड यांच्या घरात पाच ते सहा फुटाचे क्रोबा साप आढळून आले. घरात साप पाहून बेरड कुटुंबिय चांगलेच घाबरून गेले. याबाबत त्यांनी सर्पमित्र कृष्णा बेरड यांना माहिती दिली. कृष्णा यांनी अशोक बेरड यांच्या घरी येऊन हे दोन्ही साप पकडले. त्यानंतर वन अधिकारी सचिन शहाणे, वनरक्षक अर्जुन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही सापांना चांदबीबी महाल परिसरातील निसर्गात मुक्त करण्यात आले. यावेळी अंकित चव्हाण, आकाश पवार, ओम जंगम आदी उपस्थित होते. यावर्षी कोब्रा, अजगर, घोणस, मन्यार आदी जातीचे सर्प रहदारीचे ठिकाण, रस्ते व शेतात आढळून येत आहेत. सर्प आढळून आल्यास त्यांना मरू नये. त्यांना पकडण्यासाठी सर्पमित्रांशी संपर्क करावा, असे आवाहन सर्पमित्र कृष्ण बेरड यांनी केले आहे