ट्रॅक्टरच्या धडकेत ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सागर शिवाजी राठोड (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संकेत कृष्णा जाधव असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील शेतकरी लक्ष्मण दशरथ संपकाळ यांच्या गोल नावाच्या शिवारातील शेतामध्ये उसाच्या ट्रॅक्टरची धडक बदल्याने ऊसतोड मजुराच्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, अल्हनवाडी येथील ऊस तोडणी कामगार कृष्णा बबन जाधव हे पत्नी समवेत गुरुवारी ऊस तोडणीचे काम करत होते. दुपारी तीन वाजता भाऊसाहेब विरंगळे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन चालक सागर शिवाजी राठोड हा साखर कारखान्याकडे ऊस भरून निघाला होता. शेतातून रस्त्यावर ट्रॅक्टर नेत असताना डाव्या चाकाची धडक बसून संकेत जाधव हा मुलगा गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने कोरेगावातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी कृष्णा बबन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सागर शिवाजी राठोड याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक राऊत तपास करीत आहेत.