महाराष्ट्र
शेवगाव- उद्घाटनाच्या हट्टाने रखडली जलजीवन याेजना! उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता
By Admin
शेवगाव- उद्घाटनाच्या हट्टाने रखडली जलजीवन याेजना! उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जलजीवन मिशन योजनेची अनेक कामे कार्यारंभ आदेश मिळूनही, केवळ उद्घाटनाच्या हट्टाने रखडली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील काही गावांत पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.
यात रद्द झालेल्या हातगाव प्रादेशिक योजनेच्या 20 गावांचाही समावेश आहे. या गावांत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर असूनही, केवळ उद्घाटनासाठी त्यांची कामे सुरू झाली नाहीत.
शेवगाव तालुका टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना, टंचाईग्रस्त गावांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून स्वंतत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत.
हातगावसह 28 गावांच्या प्रादेशिक योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून बंद होते. त्यामुळे लाभार्थी गावांनी या योजनेला विरोध केल्याने ही योजना रद्द झाली. त्यानंतर या योजनेतील काही गावे शहरटाकळी योजनेत समाविष्ट करण्यात आली. तर, इतर गावांमध्ये जलजीवन योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत.
तालुक्यात सन 2021-22 व 2022-23 मध्ये कोनोशी, गोळेगाव, वाघोली, वडुले खु, मळेगाव-शे, दहिगाव-ने, नागलवाडी, जोहरापूर, रांजणी, कर्हेटाकळी, चेडेचांदगाव, विजयपूर, भायगाव, नवीन खामपिंप्री, खानापूर, निंबेनांदूर, जुनी खामपिंप्री, गायकवाड जळगाव, शेकटे खु., पिंगेवाडी, सुकळी, सुळे पिंपळगाव, शेकटे बु., घेवरी देवळाणे, मडके, कांबी, प्रभुवडगाव, हातगाव, खडके, सोनविहीर, मुंगी, मुरमी, लाडजळगाव, बाडगव्हाण, अधोडी, दिवटे, राक्षी अशा 37 गावांत जलजीवन मिशन योजनेतून जवळपास 54 कोटी रूपये खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत.
यापैकी कोनोशी, गोळेगाव, वाघोली, वडुले खु, मळेगाव-शे, दहिगाव-ने अशा फक्त सहा गावांत या योजनेचे काम सुरू झाले आहे. तर, उर्वरित 24 गावांतील योजनेचे कार्यारंभ आदेश प्राप्त असून, सहा गावांच्या निविदा प्रसिद्ध आहेत व एका गावाचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. यामध्ये 11 गावांतील योजनेचे पुनरुर्जीवन करण्यात येणार आहे व 26 गावांत नवीन योजना होणार आहेत.
मंजूर योजनेतील 20 गावे ही रद्द झालेल्या हातगाव प्रादेशिक योजनेतील आहेत. अगोदर प्रादेशिक योजनेने ग्रासलेल्या या गावांना उन्हाळ्यात नवीन योजनेतून पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ उद्घाटनाच्या हट्टापायी काही गावांच्या योजनेचे कार्यारंभ आदेश असताना, अद्याप येथील काम सुरू झाले नाही. त्यामुळे उन्हाळा तेथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सतावण्याची शक्यता आहे.
उद्घाटन नेमके कोण करणार?
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन मिशन योजनेस केंद्र सरकार व राज्य सरकार याचा पन्नास-पन्नास टक्के हिस्सा आहे. त्यामुळे या योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी अथवा आमदार, खासदार करणार की, आता सर्व जण एका व्यासपीठावर येणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
Tags :
16480
10