पांढरवस्ती(सुसरे)शाळेची शै.सहल उत्साहात संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंची माहिती व्हावी या हेतूने शुक्रवार दि.१७-२-२०२३ रोजी जि.प.प्रा.शाळा पांढरवस्ती(सुसरे) शाळेने एकदिवशीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.सहलीला जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.सकाळी महाशिवरात्रीच्या पर्वणी काळातच बारा जोतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर येथे श्री.भोलेनाथांचे दर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी डिंबे येथील कुकडी नदीवरील प्रकल्पाचे मनोहर दृश्य पाहून आपल्या सोबत आणलेल्या शिदोरीवर यथेच्छ ताव मारला.पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांचे जन्मस्थान-शिवनेरीचे कुतूहल मनात ठेवून त्वरेने बसेसनी मार्गक्रमण केले,कारण शिवजयंतीच्या पूर्वसंधेला ही संधी प्राप्त झाली होती.शिवरायांच्या जन्माने पुनीत झालेल्या शिवनेरीगडावर विद्यार्थ्यांनी न थकता मार्गाक्रमण केले.सर्व दरवाजे पार करत शिवाईदेवीचे दर्शन केले.पुढे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वराच्या पावन जन्मक्षेत्राचे सर्वांनी मनःपूर्वक दर्शन घेतले.परिसराच्या विहंगम दृश्याचे सौंदर्य मनात साठवून सहल लेण्याद्रीकडे रवाना झाली.लेण्याद्री दर्शन करून ओझरकडे प्रवास सुरू झाला.ओझर येथे विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले व तेथील बागेची सायंकालीन विलोभनीय दृश्ये मनात साठबून ठेवत विद्यार्थी व शिक्षकांनी देवस्थान ट्रस्टच्या अन्रछत्रातील महाप्रसाद घेतला.व नंतर बसेसनी परतीच्या प्रवासासाठी मार्गाक्रमण केले.सहलीच्या यशस्वीतेसाठी पालक,गटशिक्षणाधिकारी श्री.अनिल भवार साहेब,केंद्रप्रमुख श्री.बागडे साहेब,शाळेचे शिक्षक श्री.संदीप महामुनी,श्री.बप्पासाहेब शेळके यांचे योगदान लाभले.