महाराष्ट्र
ग्रामसेवकच निघाला गांजा तस्कर; नगर येथून अटक एक वर्षापासून होता फरार
By Admin
ग्रामसेवकच निघाला गांजा तस्कर; नगर येथून अटक एक वर्षापासून होता फरार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गांजा तस्करी प्रकरणात मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या नगर जिल्ह्यातील केडगावमधील ग्रामसेवकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली.
संबंधित ग्रामसेवकाला गतवर्षीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते, तेव्हापासून तो फरारी झाला होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
किशोर किसनराव जेजुरकर (रा. केडगाव, लोंढेमळा, नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या वर्षी (फेब-ुवारी 2022) मध्ये अमली पदार्थविरोधी पथक एकने शहरातील नगर रस्त्यावर कैलास साहेबराव पवार (वय 35, रा. गडदे वस्ती, वाडेबोल्हाई रस्ता, ता. हवेली) याला अटक केली होती. त्याच्याकडून 128 किलो 765 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पवार याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जेजुरकर याच्याकडून गांजा विक्रीस आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाकडून जेजुरकरचा शोध घेण्यात येत होता. जेजुरकरच्या घरी पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, तो सापडला नव्हता. त्यानंतर जेजुरकर हा ग्रामसेवक असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पारनेर पंचायत समितीकडे याची माहिती दिली.
त्यानंतर जेजुरकर याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते, तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. या दरम्यान जेजुरकर हा केडगाव येथे आल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस अंमलदार योगेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जेजुरकरच्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनोज साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे आदींनी ही कारवाई केली.
Tags :
19076
10