जिल्हा परीषदेसमोर 'काळाबाजार' आंदोलन
नाशिक : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्ट
व कलंकित अधिकारी तसेच अपहार सुरू असलेल्या खासगी अनुदानित संस्था यांच्याविरोधात मंगळवारी (दि. ९) आजाद समाज पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडीतर्फे जिल्हा परिषदेसमोर 'काळा बाजार' आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध खासगी अनुदानित संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या जागांवर सर्वसाधारण जागेतील उमेदवारांची भरती केली आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून संबंधित संस्थांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील भरती झालेले कर्मचारी यांनी बनावट जात प्रमाणपत्र व जात
पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले आहेत किंवा कसे? याबाबत चौकशी करावी. कलंकित अधिकाऱ्यांची बदली करावी. माध्यमिक शिक्षण विभागात नियमबाह्य कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून ते त्यांच्या पदावर कायम आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, आदी मागण्या
यावेळी करण्यात आल्या. भाई चंद्रशेखर आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे, कैलास दवंडे, संदीप मोरे, जिल्हाध्यक्ष पंकज साळवे, अमोल आहेर, शहराध्यक्ष मनोज पाटील, सचिन जाधव, संगिता निकम, मनिषा पवार आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.