अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या दीडशे कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी जेरबंद
By Admin
अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या दीडशे कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या दीडशे कोटींच्या फसवणूक प्रकरणातील बहुचर्चित आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदा) याला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने पकडले आहे. दरम्यान, गायकवाड याला पकडल्याने नगर अर्बन बँकेच्या विश्वात खळबळ उडाली आहे. बँकेच्या सत्ताधार्यांशी जवळीक असलेल्या गायकवाडने पोलिस तपासात तोंड उघडले तर बँकेशी संबंधित अनेक बडी मंडळी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी नगर अर्बन बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटीची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिल्याने कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सचिन गायकवाड याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तक्रारदार राजेंद्र गांधी यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करीत सचिन गायकवाडचा कर्ज खातेउतारा सादर केला व त्यात 1 कोटी, 50 लाख, 35 लाख अशा रोख रकमा काढल्याच्या नोंदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्याने हे पैसे कोणाला दिले, याचा तपास होण्याची गरज मांडली होती. त्यामुळे न्यायालयाने हे म्हणणे मान्य करून सचिन गायकवाडचा अटकपूर्व जामीन मागणीचा अर्ज फेटाळला. परिणामी, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता व त्याला सोमवारी श्रीगोंदे तालुक्यातील कौडगाव येथून ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त सोमवारी सायंकाळी नगरमध्ये वार्यासारखे पसरल्याने अर्बन बँकेच्या विश्वात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक आव्हाडांची कामगिरी
नगर अर्बन बँकेच्या 150 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती पाचपुते, पोलिस हवालदार राठोड व आर्थिक गुन्हे शाखेतील कर्मचार्यांनी ही कामगिरी केली.
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)