महाराष्ट्र
व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी 15 सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल,7 जण अटकेत
By Admin
व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी 15 सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल,7 जण अटकेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
'शिवराम वडेवाले'चे मालक शिवराम रमेश वहाडणे आत्महत्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पंधरा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवराम यांना दिलेल्या कर्जापोटी अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे उकळून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
शिवराम वहाडणे यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत शिवराम यांची पत्नी वंदना वहाडणे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. शिवराम वहाडणे यांच्या वहीमध्ये सावकारांनी दरमहा 10 ते 40 टक्क्यांपर्यंत व्याजाने 10 लाख रुपये दिल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी वहाडणे यांच्या वह्या जप्त केल्या आहेत. एका सावकाराने तर 20 हजार रुपयांच्या कर्जावर दररोज सातशे रुपये व्याज उकळल्याचे समोर आले आहे. त्यातील सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
वंदना वहाडणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जयसिंग म्हस्के, शहाजी झुंजरुक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण , अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रवीण जाधव, धीरज भोसले, आकाश भोसले, राहुल खामकर, संतोष शिंदे, विनोद घोडके, मुन्ना काळे, राजू बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाने जयसिंग म्हस्के, कांतीलाल कोकाटे, अक्षय कैयतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, राजू बोरुडे, बापू चव्हाण यांना तातडीने अटक केली. इतर आरोपी सावकारांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या खासगी सावकारकीला चाप लावण्यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय, परवानाधारक सावकारांसाठीदेखील नियम तयार करण्यात आले आहे. खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज दिले जाते. या कर्जाच्या ओझ्यामुळे अनेकांची मालमत्तादेखील बेकायदेशीरपणे जप्त करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. श्रीगोंद्यातील व्यावसायिकाच्या आत्महत्येनंतर राज्यातील खासगी सावकारीचा जाच पुन्हा एकदा समोर आला आहे.
कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची, दुकानही हिसकावले; धुळ्यातील प्रकार
एका अवैध सावकाराने ट्रॅव्हल्स चालकाला दोन लाखांचे कर्ज दिले, त्या बदल्यात 22 लाखांची वसुली केली. तरीदेखील रोजीरोटीचे साधनच असलेले दुकान हिसकावले, दुकान ताब्यात हवे असेल तर 11 लाख रुपये दे, अशी खंडणी मागितली. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारात सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी त्या सावकाराने दुसरा सावकार शोधून दिला. दुसऱ्याच्या कर्जाची फेड करण्यासाठी तिसऱ्या सावकाराकडून पैसे मिळवून दिले, या तिघांनी मिळून ट्रॅव्हल चालकाचे आर्थिक शोषण केल्याचं समोर आले. एवढेच नव्हे तर वेळोवेळी धमक्या दिल्या शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तीन अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
540
10