Breaking- 'या' मतदार संघातील गावात पिण्याच्या पाण्याकरिता संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
तीन महिन्यांपासून गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यामधील रातंजन गावात मागील तीन महिन्यांपासून वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणी असुनही विजेअभावी पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याकरिता संतप्त महिलांनी आज रातंजन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढून वीज कंपनीच्या विरोधात आपला संतप्त व्यक्त केला.
रातंजन या गावामध्ये मागील तीन महिन्यांपासून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला भगिनींना भर उन्हात मैलदूर भटकंती करावी लागत आहे.
रातंजन या छोट्याशा ग्रामपंचायतीला वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर नेहमीच नादूरूस्त होत असल्याने येथील ग्रामपंचायतीला आतापर्यंत विजेकरिता लाखभर रूपये खर्च करावे लागले असुन वेळोवेळी ट्रान्सफॉर्मर बदलून देखील कमी दाबाने विज पुरवठा होत आहे.
येथील पाणीपुरवठा विहिरीत मुबलक पाणी आहे, मात्र विजेअभावी गावाला पाणीपुरवठा करणे अडचणीचे झाल्याने रातंजन गाव करिता स्वतंत्र फिडर वरून वीज जोडणी करण्यात यावी, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.
अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रातंजन गाव कर्जत जामखेड मतदार संघामध्ये असून आमदार रोहित पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यावेळी सरपंच अर्चना सोमनाथ काळे, उपसरपंच आदिका बजरंग बांदल, ग्रामपंचायत सदस्य डॉ.श्रीराम धस, मा.सरपंच विकास झांबरे, विलास काळे, बाळासाहेब जगदाळे, शरद सकट, राजू कणसे, सचिन गायकवाड, सचिन झांबरे, संतोष कणसे, बापू झांबरे, विलास बांदल, अक्षय फरताडे, नितीन झांबरे, विष्णू काळे, बंटी सकट व सर्व सदस्य, ग्रामसेवक अमित कोल्हे आदी ग्रामस्थांसह महिला भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.