महाराष्ट्र
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले
By Admin
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे करण्यात आलेल्या कामाची परवानगी आणि पाहणी करण्यासाठी पंचायत समितीमधील कनिष्ठ शाखा अभियंत्याने तब्बल १९ हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे.
लाच स्वीकारताना हा अधिकारी लाचलुचपतच्या सापळ्यात अलगदपणे अडकला.संजय गोविंदराव ढवण (रा. श्रीरामपूर) असे या लाचखोर अधिकार्याचे नाव असून हा अधिकारी संगमनेर पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून नियुक्तीस आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अधिकारी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला. या प्रकाराने पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली होती.संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे करण्यात आलेल्या कामाची पाहणी आणि आवश्यक परवानगीसाठी ठेकेदाराने पंचायत समितीतील अभियंता ढवण यांच्याशी संपर्क केला होता.
मात्र ढवण याने परवानगी मिळविण्यासाठी व पाहणी करण्यासाठी संबंधित तक्रारदार ठेकेदाराकडे ३ लाखाच्या कामाच्या मोबदल्यात पाच टक्के कमिशनने १५ हजार तर क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांसाठी चार टक्के कमिशनचे चार हजार अशा एकूण १९ हजार रुपयांची मागणी संबंधित ठेकेदाराकडे केली होती.त्यामुळे संबंधित ठेकेदाराने नाशिकच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क करत संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी संगमनेर पंचायत समितीमध्ये या लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून साक्षीदारासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या लाचखोर अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. लाचखोर अधिकारी संजय ढवण याने घेतलेल्या लाचेच्या रकमेत आणखी कोणते अधिकारी सामील आहे, यासंदर्भात लाचलुचपतचे अधिकारी लाचखोराकडे सखोल चौकशी करत होते. दरम्यान या संदर्भात पंचायत समितीतील आणखी एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे.लाचखोर संजय ढवण याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
Tags :
8650
10