सहकार क्षेत्रात खळबळ : अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याच्या चौकशीचा आदेश
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश साखर आयुक्तांनी प्रादेशिक सहसंचालकांना दिला आहे.
अगस्ती साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करून संचालकांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह मनोहर मालुंजकर, मारुती भांगरे, प्रल्हाद देशमुख, दिलीप देशमुख, भगवंत सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली होती.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत साखर आयुक्तांना आदेश दिला. त्यानुसार साखर आयुक्तांनी येथील प्रादेशिक सहसंचालकांना अगस्ती कारखान्याची तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या १ ते १३ मुद्द्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
कारखान्याने अत्मनिर्भर कर्जाच्या नावाखाली ५५ कोटींचे कर्ज उचलले आहे. साखर निर्यात अनुदानासह केंद्र व राज्य शासनाचे व्याज व अनुदानाच्या नावाखाली १६ कोटींचे कर्ज भारतीय रिझर्व्ह बँकेचे निकष डावलून घेतले आहे.
या कर्जाचा विनियोगही याेग्य पद्धतीने न केल्याने त्यात भ्रष्टाचार झालेला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अगस्ती कारखान्यांच्या संचालकांनी विविध कामांसाठी बँकांकडून कर्ज उचलले. या कर्जाचा विनियोग न करता गैरव्यहावर केला आहे. त्यामुळे कारखाना डबघाईस आला आहे.
कारखान्यांच्या सभासदांचे मोठे नुकसान होणार असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संचालक मंडळांकडून वसुली करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.