अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष कर्डिलेंच्या गौप्यस्फोटाकडे
अहमदनगर- प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेच्या नगर तालुका विकास सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला आहे. दरम्यान कर्डीले यांनी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय लोकांवर सूचक टीका केली.
ते म्हणाले, आम्ही मागील पाच वर्षात दुष्काळी भागातील शेतकरी, दूध उत्पादक व महिला बचत गटांना दिलासा देण्याचे काम बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून केले. परंतु ते जिल्ह्यातील कारखानदारांना भावले नाही. त्यामुळे मी संचालक होऊ नये,
यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मला पाडण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळींनी केला.
परंतु तो अपयशी ठरला आहे. माझा विजय झाला असून
यापुढेही जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच दूध उत्पादक व महिला बचत गटांसाठी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमची यापुढे भूमिकाही या शेतकऱ्यांना साथ देण्याची राहणार आहे,
असेही कर्डिले म्हणाले. दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी तब्बल 17 जागा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाल्या. परंतु शिवाजी कर्डिले यांना मात्र निवडणूक लढवावी लागली व ते विजयी झाले.
विजयानंतर त्यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांवर टीका केली व लवकरच जिल्ह्यातील कारखानदार मंडळींनी बँकेचे कसे फायदे घेतले, याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे सूचक उद्गार काढले. दरम्यान कर्डीले काय गौप्यस्फोट करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे