महाराष्ट्र
शेवगाव- प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा प्रकार
By Admin
शेवगाव- प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा प्रकार
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेवगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापकानेच एका विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार घडला. या विद्यार्थिनीचे नातेवाईक व शहरातील काही तरुणांनी 'त्या' प्राध्यापकाची येथेच्छ धुलाई केली.
हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापक व तरूणांना पोलिस ठाण्यात आणले. मात्र, तडजोड झाल्यामुळे कुठलीही कारवाई न करता, या प्राध्यापकास रात्री उशिरा सोडून देण्यात आल्याने शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. शहरातील एका महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला.
या प्राध्यापकाने या अगोदरही काही विद्यार्थिनींची छेड काढल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, बदनामीच्या भितीने विद्यार्थिनी पुढे आल्या नाहीत. किंबहुना महाविद्यायालयीन पातळीवरच असे प्रकरण दडपले जात होते. मात्र, या प्राध्यापकांच्या कृष्णलिलांचा अतिरेक झाल्यामुळे छेडछाड झालेल्या या विद्यार्थिनीने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महाविद्यालयात येऊन या प्राध्यापकास जाब विचारला. मात्र त्याने अरेरावीची भाषा वापरल्याने नातेवाईक व तरूणांनी त्याची चांगलीच धुलाई केली.
हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्राध्यापकास ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले. परंतु, त्याच दिवशी कुठलीही कारवाई न करता रात्री उशिरा त्यास सोडून दिले. छेडछाड झालेल्या विद्यार्थिनीने धाडस दाखवित नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्याने या प्राध्यापकास चांगलीच अद्दल घडली. त्याचबरोबर पुढेही विद्यार्थिनींबरोबर असे प्रकार करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असा वचक निर्माण झाल्याने पालक या विद्यार्थिनीचे कौतुक करीत आहेत. तर, शिक्षण क्षेत्रात गुरूची भूमिका बजावणार्या प्राध्यापकाने केलेल्या या कृत्याबद्दल त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा प्रकार महाविद्यालयात घडलेला आहे. याबाबत त्या प्राध्यापकाची माहिती लेखी स्वरूपात संस्थेकडे कळविण्यात आली आहे. त्याच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.
-प्राचार्य, संबंधित महाविद्यालय, शेवगाव
छेडछाडीवरून प्राध्यापकास मारहाण झाल्याची माहिती कळल्यानंतर, महाविद्यालयात जाऊन त्यास व संबंधित तरूणांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. मात्र, कोणीही फिर्याद न दिल्याने त्या प्राध्यापकास सोडून दिले.
-सहायक पोलिस निरीक्षक,पोलिस ठाणे, शेवगाव
Tags :
2097
10