पाथर्डी- जखमी काळविटावर उपचार;वन्यजीव संपायला वेळ लागणार नाही
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळविटावर मोहजदवढे ग्रामस्थांनी उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले. वन्य प्राण्याचा शिकारीसाठी शिकार्याने लावलेले जाळे तोडून काळवीट लोकवस्तीमध्ये आले.
तेथे कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. जखमी काळविटाला ग्रामस्थ भाऊराव रुपनर, अप्पा रुपनर, माउली रुपनर, योगेश रुपनर, गोवर्धन रुपनर यांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांच्या ताब्यात दिले.
काळविटावर उपचार करण्यात आले आहेत. मोहोज देवढे, रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी व बहीरवाडी या चार वाड्यांच्या कार्यक्षेत्रात वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. डोंगराळ भाग असल्याने काही शिकारी डोंगरपरिसरात जोळे लावून काळवीट व हरणाची शिकार करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत. वनविभागाच्या कर्मचार्यांना माहिती देऊनही ते शिकार्यांवर कारवाई करीत नाहीत, असा आरोप माजी सरपंच गणेश चितळकर व ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, तालुक्यात हरणांची संख्या वाढली असून, डोंगरदर्यात हरणांचे कळप धावताना दिसत आहेत. या हरणांची शिकार करण्यासाठी काही शिकारी त्यांच्यामागे धावताना दिसत आहेत. त्यांचा वन खात्याने बंदोबस्त करण्याची गरज आहे.
तर वन्यजीव संपायला वेळ लागणार नाही
या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहे. त्यात हरीण, काळवीट, ससे, कोल्हे, लांडगे यांचा समावेश आहे. दीड वर्षापूर्वी हरणाची शिकार करणार्या शिकार्यांचे सामान वन विभागाने जप्त केले होते. या भागात मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. वन विभागांने याचा बंदोबस्त केला पाहिजे, अन्यथा वन्यजीव संपायला वेळ लागणार नाही.