शेवगाव- रामदेवबाबांच्या पुतळ्याचे दहन; पतंजलीची उत्पादने न वापरण्याची घेतली शपथ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव - योगगुरू रामदेवबाबा यांनी महिलांबाबत खालच्या पातळीची भाषा वापरून समस्त महिला वर्गाचा अपमान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रामदेव बाबाचा पुतळा जाळून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संविधान दिनानिमित्त आज सकाळी येथील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात रामदेव बाबा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळ्यास जोडे मारले. रामदेव बाबा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या.
प्रा. चव्हाण यांनी रामदेवबाबा, भगतसिंग कोश्यारी ही मनुवादी पिलावळ असल्याची टीका करत रामदेवबाबा यांच्या पतंजलीचे एकही उत्पादन वापरणार नाही, अशी शपथ घेऊन सर्वांनी त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष राजू नाईक, जिल्हा संघटक शेख बन्नूभाई, शेवगाव महिला अध्यक्ष संगीता ढवळे, पाथर्डी महिला तालुका अध्यक्ष सुनिता जाधव, मंगल इंगळे, शेवगाव तालुका उपाध्यक्ष मनीषा आंधळे, सलीम भाई, शेख जिलानी, विशाल इंगळे, शेख चांद भाई दिलीप वाघमारे, विष्णू वीर, संजय कांबळे, मुन्नावर शेख, संतोष चिंतामणी, बाळासाहेब भोंगळे, शेख मुसाबाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवगाव पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नोटिसा बजावून सोडून दिले.