डाॕ. सुजय विखेंनी नितीन गडकरी यांच्याकडे केला पाठपुरावा ! रस्त्यांसाठी दिले 35 कोटी
अहमदनगर- प्रतिनिधी
जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण- नगर- नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 35 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, की कल्याण व नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी होत होती. जिल्ह्याच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्राबरोबरच तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन, या महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता.
रस्ताकामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळून 35 कोटी 42 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून नेप्ती चौक ते सक्कर चौक (सहा किलोमीटर), स्टेट बॅंक ते चांदबीबी महाल (दहा किलोमीटर), चांदबीबी महाल ते मेहेकरी (चार किलोमीटर) हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. या मार्गाला निधी उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही फायदा होईल. याच निधीत नगर शहरातील रेल्वे पूल ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वे पूल ते सीना नदीपात्रापर्यंत कॉंक्रिट गटारकामाचा समावेश असल्याचेही खासदार विखे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.