पाथर्डी- सात वर्षापासून सुरु असलेले महामार्गाचे काम कासव गतीने, खड्ड्यामुळे अपघात वाढले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातून जाणाऱ्या महामार्ग नुतनीकरणाचे काम गेल्या सात वर्षा पासून कासव गतीने सुरु असून या कामासाठी केलेली खोदाईची दुरुस्ती न झाल्याने दरवर्षी ऐन पावसाळ्यात प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून पडलेल्या मोठमोठ्या खड्डया मुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.
तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या नुतनीकरणासाठी १३० कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात येवून गेल्या सात वर्षा पासून नुतनीकरनाचे काम हाती घेण्यात आले परंतु हे काम अनेक ठिकाणी २०१५ पासून अर्धवटच असल्याने शेकडो निष्पाप प्रवाश्यांचे अपघात झाले याबाबत स्थानिक राजकीय पदाधिकारी,विरोधक यांनी तेवढ्या पुरते आंदोलने केली परंतु पुढे हा आंदोलनाचा सूर चमत्कारिक रित्या मावळला.या कामाच्या ठेकेदाराने गेल्या दोन दिवसा पूर्वी झालेल्या आंदोलनाच्या रेट्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात केली मात्र खड्डे बुजवण्यासाठी चक्क माती वापरल्याने अवजड वाहने या चिखलात रुतून वाहन चालकांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. ज्यांना या कामा बाबत प्रश्न विचारून काम मार्गी लावण्याचा अधिकार आहे ते पुढारी मात्र मुग गिळल्या गत गप्प बसून असल्याने नागरिक मात्र हतबल असून अर्धवट कामाने रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.