ग्रामपंचायतींच्या पथदिवे तसेच पाणीपुरवठा योजनांची बिले सरकार भरणार , आ.निलेश लंके यांच्या मागणीची शासनाने घेतली दखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
काेरोना कालावधीमध्ये ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटल्यामुळे ग्रामपंचायतींच्या पथदिवे तसेच पाणीपुरवठा योजनांची बिले सरकारने भरावीत या आमदार नीलेश लंके यांच्या मागणीची राज्य शासनाने दखल घेतली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंतची दोन्ही बिले राज्य सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार लंके यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या अडचणीसंदर्भात ५ जुलैला राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आपल्या मतदारसंघात अनेक छोटया ग्रामपंचायती असून त्यांच्याकडे सध्या कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे बिल भरणेही काेरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणे त्यांना शक्य नाही. काेरोना काळातही महावितरण मार्फत ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांची लाखो रूपयांची बिले पाठविण्यात आली आहेत. त्यासंदर्भात माझ्याकडे विविध ग्रामपंचायतींनी तक्रारी केलेल्या असल्याचे आमदार लंके यांनी मुश्रीफ यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले हाेते.
मंत्री मुश्रीफ यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडल्यानंतर संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे तसेच पाणीपुरवठा योजनांची बिले भरण्याचा निर्णय घेतला आहे.