गाय गोठा योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे- रासप व शिवसंग्राम
पाथर्डी - प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पंचायत समिती मार्फत प्रत्येक गावांमधील पाच ते दहा प्रमाणे गाय गोठा योजनेसाठी लाभार्थी निवडले जाणार आहेत.
लाभार्थी निवडतांना कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप तसेच कुठल्याही प्रकारचा वशिला झाला नाही पाहिजे व त्या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे व मंजूर झालेल्या प्रकरणाचे लवकरच आदेश काढावेत, म्हणून रासपा ,शिवसंग्रामच्या वतीने दिनांक ८ ऑक्टोबर रोजी पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितलताई खिंडे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. तसेच येणाऱ्या नवीन गाय गोठा प्रकरणाचे लकी ड्रॉ पद्धतीने निवड व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रासपाचे तालुकाध्यक्ष म्हणाले की, ग्रामपंचायत ने प्रस्तावासोबत दिलेल्या प्राधान्यक्रमानुसारच व ते प्रकरण पंचायत समितीकडे आलेल्या क्रमानेच त्यास मंजुरी मिळायला हवी.ग्रामपंचायत स्तरापासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरापर्यंत नेहमीच खरे लाभार्थी वंचित राहत आहेत ,त्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन मागणी करत आहोत.
हे निवेदन देतांना राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष वसंत घुगरे ,शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले ,तोंडोळी चे युवा नेते नानाभाऊ पडळकर, आप्पासाहेब शेंडगे, पांडू दातीर आदी उपस्थित होते.