वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील पाचेगाव—कारेगांव रस्त्यावरील शासकीय वृक्षतोड करणार्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती तपासी अधिकारी वनविभाग प्रतिभा सोनवणे यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी पाचेगांव—कारेगाव रस्त्यालगत असणार्या शिरस जातीच्या ९ वर्ष वयाच्या शासकीय झाडांची खुलेआम बेकायदेशीर कत्तल एका सधन बागायतदाराकडून करण्यात आली होती. त्यासंदर्भात परिसरातील निसर्गप्रेमीकडून होणारी झाडाची कत्तल थांबविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासंदर्भात निसर्गप्रेमींनी पत्रकारांशी संपर्क साधून होणार्या बेसुमार वृक्षतोडीबद्दल माहिती दिली असता पत्रकार त्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर संबधित प्रकार बघितल्यानंतर या बेकायदेशीर वृक्षतोडीचे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्या अनूषंगाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वनविभागाच्या तपासी अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता तब्बल ६० झाडे बेकायदेशीर रित्या तोडल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तसा अहवाल त्यांनी तयार केला असून तो वरिष्ठांकडे पाठवून दोषीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.