ध्येयवेडा माणूस निर्माण करणे हीच खरी वाचनसंस्कृती –डॉ. जी. पी. ढाकणे
पाथर्डी प्रतिनिधी:
वाचन हा एक संस्कार असून आपले राष्ट्र समृद्ध करण्याचा अविष्कार आहे. वाचनाने प्रेरणा, चेतना, उत्साह आणि प्रसन्नता निर्माण होते. एखादे पुस्तक जीवनाचा आधार बनते, तर कित्येकांची यशोगाथा एखाद्या पुस्तक वाचनाच्या प्रेरणेतून साकारते,असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत वाचनध्यास या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, प्रा. सुरेखा चेमटे, डॉ. अजयकुमार पालवे आदी उपस्थित होते.
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले,आपण फक्त वाचून चालणार नाही, तर त्यावर चिंतन आणि मनन केले पाहिजे. तीर्थयात्रांपेक्षाही ग्रंथयात्रा अधिक पुण्यप्रद असून यामुळेच वाचन या अक्षरब्रम्हाची खरी उपासना घडते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनचळवळीचा विकास, हे आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले पाहिजे किंबहुना ध्येयवेडा माणूस निर्माण करणे, हीच खरी वाचनसंस्कृती होय. असे ते शेवटी म्हणाले.
कनिष्ठ महाविद्यालयात जेष्ठ प्रा. रमेश मोरगावकर यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांनी वाचनाचे महत्व विशद करून वाचाल तर वाचाल, हे तत्व प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारावे असे सांगितले.
ग्रंथालय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या वाचनध्यास उपक्रमाचे संयोजन प्रा. किरण गुलदगड, प्रा. सुरेखा चेमटे व ग्रंथालय कर्मचारी यांनी केले. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग पाच तास आपल्या आवडीचे पुस्तक वाचून या उपक्रमात सहभाग घेतला.