विवाहितेची विहीरीत उडी घेत आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील निंमोणी मळा परिसरातील कसार वस्ती येथील हिराबाई दादासाहेब कसार ( वय ५०) यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या सामायिक विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली.
नातेवाईकांनी हिराबाई घरात दिसत नसल्याने सर्वत्र शोधाशोध केली. परंतु गट नंबर दोनशे दहा या सामायिक विहिरीजवळ हिराबाई यांच्या चप्पल आढळून आल्याने संबंधित नातेवाईक ग्रामस्थ यांनी विहिरीमध्ये लाईटच्या साहाय्याने पाहिले असता विहिरीमध्ये मयत हिराबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळुन आला. घटनेची माहिती श्रीरामपूर पोलिस ठाणे या ठिकाणी कळविण्यात आली. यावरून घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष दरेकर, धनंजय वाघमारे यांनी भेट देत विहिरीमधील मृतदेह वडाळा महादेव ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व नातेवाईक यांचे मदतीने बाजीच्या साहाय्याने वरती काढण्यात आला. हा मृतदेह श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.